Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिंदेंचा आणखी एक लाडका 'संजय' अडचणीत; मंत्री राठोड यांना CM फडणवीस यांचा दणका

शिंदेंचा आणखी एक लाडका 'संजय' अडचणीत; मंत्री राठोड यांना CM फडणवीस यांचा दणका
 

भरत गोगावले, मंत्री संजय शिरसाट, आमदार अर्जुन खोतकर, आमदार संजय गायकवाड यांच्यापाठोपाठ आता जलसंधारण मंंत्री संजय राठोड हेही अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राठोड यांना दणका दिला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या भाजप आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसंच त्यांनी तब्बल आठ अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक केल्याचाही दावा करण्यात आला होता. जोशी यांनी याबाबतचं एक पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं.

काही दिवसांपूर्वीच जलसंधारण विभागामध्ये सुनील कुशिरे या एका अधिकाऱ्यावर 3 अतिरिक्त पदांचा कार्यभार देत मेहरबान झालेल्याचा आरोप संजय राठोड यांच्यावर झाला. अशात आता जलसंधारण खात्यातील कामांना देण्यात आलेली सुधारित प्रशासकीय मान्यताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली आहे. हा राठोड यांना दणका मानला जात आहे. राठोड यांच्या याच एका एका प्रकरणामुळे त्यांच्या विरोधात महायुतीचेच आमदार अधिवेशनात खासगीत फार वाईट बोलताना अनुभवास येते.

इतरही आमदार, मंत्री सापडले वादात :
आमदार अर्जुन खोतकर हे धुळे दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या रुममध्ये रोकड सापडली होती. सध्या याची चौकशी सुरु आहे. रोहयो मंत्री भरत गोगावले हे राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार सुनिल तटकरे, खासदार नारायण राणे यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वकत्व्यामुळे वादात सापडले होते. अशातच गोगावले यांचा वादग्रस्त व्हिडीओ आणि फोटोच व्हायरल झाला.

पाठोपाठ संजय शिरसाट यांचीही एकामागून एक प्रकरण बाहेर निघाली. आधी त्यांच्या मुलावर एका महिलेने फसवणुकीचे आरोप केले. मग शिरसाट यांच्या मुलाचा हॉटेल खरेदीचा मुद्दा गाजला. या प्रकरणात नुकतीच फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचेही आरोप केले.

अशात संपत्तीत वाढ झाल्याबद्दल काही दिवसांपूर्वी शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. स्वतः शिरसाट यांनीही हे मान्य केले. ते प्रकरण शांत होण्यापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांचा एक व्हिडीओ ट्विट केली. त्यात शिरसाट त्यांच्या रुममध्ये बनियनवर बसले असून त्यांच्या बाजूला असलेल्या बॅगेत नोटांची बंडले दिसत आहेत.

आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टिनमध्ये केलेल्या राडा आणि मारहाणीमुळे पक्षाची प्रतिमा अधिक डागळली. आधी शिवसेनेने गायकवाड यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.