Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला! पुण्याला २०० किमीचा अडथळा; सोलापूरचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री तरी त्यावेळी कार्यवाही नाही, वकिलांचा ३४ वर्षांचा लढा अपयशी

उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला! पुण्याला २०० किमीचा अडथळा; सोलापूरचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री तरी त्यावेळी कार्यवाही नाही, वकिलांचा ३४ वर्षांचा लढा अपयशी
 

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरात व्हावे, अशी १९९१ पासून येथील वकिलांची मागणी होती. लातूर व धाराशिव जिल्ह्यातील वकिलांचाही याला पाठिंबा होता. विशेष बाब म्हणजे १६ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ या काळात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूरचेच होते.

राज्याच्या विधी व न्याय विभागाचे मंत्रिपदही सोलापूरला मिळाले होते. तेव्हाही याबाबत ठोस पाठपुरावा झाला नाही. पुण्याची मागणी होती, पण २०० किमी अंतराच्या मर्यादेत तेथे खंडपीठ शक्य नव्हते. त्यामुळे सोलापूरला होईल, अशी सर्वांनाच आशा होती. मात्र, ३४ वर्षांची वकिलांची मागणी पूर्ण झाली नाही. आता उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला झाल्याने सोलापूरकरांची मागणी निकाली निघाली आहे.

दरवर्षी सोलापूरचे सुमारे साडेचार ते पाच हजार खटले मुंबई उच्च न्यायालयात दाखल होतात. त्यामुळे सोलापूरकरांचे श्रम, वेळ, पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने सोलापूरच्या वकिलांची खंडपीठाची मागणी होती. भौगोलिकदृष्ट्या सोलापूरसाठी खंडपीठ आवश्यक होते. सोलापूकरांनी कोल्हापूर, पुण्याच्या मागणीला विरोध केला नाही. पण आपली मागणी सोडली नाही. सोलापूर बार असोसिएशनने २०१३ मध्ये सोलापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी ५१ दिवस आंदोलन केले. त्या काळात ज्येष्ठ व नवोदित वकिलांसह व्यापारी, कामगार, शिक्षक संघटनांनीही पाठिंबा दिला होता. 
 
मोठा मोर्चाही निघाला, सर्व आमदारांना निवेदने दिली होती. उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी धाराशिव व लातूरचा पाठिंबा असल्याचेही दाखवून दिले होते. पण, पुढे हा रेटा टिकून राहिला नाही आणि राजकीय नेतृत्वाकडूनही साथ मिळाली नाही, अशीही वकिलांची खंत आहे.

चार तालुक्यांचा पाठिंबा कोल्हापूरला; राजकीय नेत्यांचेही मागणीकडे दुर्लक्ष

सोलापूरकरांचा रेटा कमी पडल्याने जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, पंढरपूर व मंगळवेढा या तालुक्यातील वकिलांनी कोल्हापूरला खंडपीठ व्हावे यासाठी पाठिंबा दिला होता. याशिवाय लढा ढिला पडल्याने उर्वरित तालुक्यातील बऱ्याच वकिलांची ओढ कोल्हापूरकडेच होती. दुसरीकडे सोलापूरची राजकीय इच्छाशक्ती देखील कमी पडली. मागील १० ते १२ वर्षांपासून सोलापूरकरांचा रेटा कमी पडल्यानेच कोल्हापूरला खंडपीठ झाल्याची खंत ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केली.

बार असोसिएशनने कृती समिती नेमली, पण...
सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वात नुकतीच सोलापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी कृती समिती नेमली आहे. पण, आता कोल्हापूरला खंडपीठ झाल्याने ही समिती पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.