Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- इस्लामपूरच्या ज्ञानेश पवार टोळीला 'मोका'; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

सांगली :- इस्लामपूरच्या ज्ञानेश पवार टोळीला 'मोका'; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
 

सांगली : इस्लामपूर येथील विनोद माने ऊर्फ वडर याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञानेश पवार टोळीला 'मोका' लावण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली. गणेशोत्सव व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करत गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे. 
टोळीप्रमुख ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञानेश भिमराव पवार (वय २४, रा. किसाननगर), चेतन पांडुरंग पवार (वय २४, रा. बहे नाका), पंकज नामदेव मुळीक (वय २५, रा. अक्षर कॉलनी), प्रतीक ऊर्फ गणेश महादेव पालकर (वय २४, रा. यल्लम्मा चौक), युवराज दयानंद कुंभार (वय २३, रा. हनुमाननगर), रोहन ऊर्फ वैभव सुभाष कांबळे (वय २४, रा. केबीपी कॉलेजजवळ),



किसन ऊर्फ सोन्या संजय कुचीवाले (वय १८, रा. माकडवाले गल्ली), प्रेम ऊर्फ विश्वजीत सुभाष मोरे (वय २०, रा. मार्केट यार्ड रस्ता), प्रथमेश संकाप्पा कुचीवाले (रा. माकडवाले गल्ली), गुरूदत्त राजेंद्र सुतार (रा. दगडी बंगल्याजवळ, इस्लामपूर) या दहाजणांना 'मोका' लावण्यात आला. या टोळीतील आठजण सध्या अटकेत आहेत. तर प्रथमेश कुचीवाले व गुरूदत्त सुतार हे दोघे पसार आहेत.
 
इस्लामपूर येथील ज्ञानेश पवार टोळीने २०१८ पासून सतत गुन्ह्यांची मालिकाच केली. वर्चस्ववादातून आणि आर्थिक व इतर फायद्यासाठी खुनाचा प्रयत्न, घरफोडी, जबरी चोरी, बेकायदा जमाव जमवून हल्ला करणे, घर अतिक्रमण करून जबरी चोरी करणे, हत्याराने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, बेकायदा सावकारी करणे, अनुसूचित जमातीतील लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, महिलांची छेडछाड व विनयभंग, चोरी, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी असे गुन्हे टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत. वर्चस्ववादातून टोळीने इस्लामपूर परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती.
 
 
फेब्रुवारी २०२५ मध्ये टोळीच्या वर्चस्वातून विनोद माने ऊर्फ वडर याचा थरारक पाठलाग करून त्याच्यावर खुनी हल्ला केला होता. या खुनी हल्ल्याप्रकरणी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल असून दोघेजण पसार झालेले आहेत. या गुन्ह्यात टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत वाढीव कलम लावण्यासाठी इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

या प्रस्तावासाठी अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांचा अभिप्राय घेतला. अधीक्षक घुगे यांनी विशेष महानिरीक्षक फुलारी यांना हा प्रस्ताव सादर केला होता. फुलारी यांनी संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी दहा संशयित आरोपींना 'मोका' लावण्यास मंजुरी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक अरूण पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, कर्मचारी बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे, इस्लामपूरचे सहायक फौजदार गणेश झांजरे, अरूण कानडे, सुशांत बुचडे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.


इस्लामपूरच्या गुन्हेगारीचा कणा मोडला

इस्लामपूर शहरात गेल्या सात महिन्यात गुन्हेगारी वर्चस्वातून आणि इतर कारणातून पाच खून झाल्यामुळे शहर हादरले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. खुनी हल्ल्यातील टोळीला 'मोका' लावून इस्लामपुरातील संघटीत गुन्हेगारीचा कणा मोडला आहे.

आणखी टोळ्या रडारवर
ज्ञानेश पवार टोळीला 'मोका' लावल्यानंतर इस्लामपूर परिसरातील इतर गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. या टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहे. या टोळ्या नेस्तनाबूत करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.