पुणे: सासरच्या लोकांनी अघोरी प्रथा पाळून एका २२ वर्षीय विवाहितेवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री विवाहितेस नग्न होऊन झोपण्यास भाग पाडणे, मुलावर संशय घेऊन अघोरी चाचणी घेण्यास भाग पाडणे यांसारखे प्रकार तिच्यासोबत घडल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर भागातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, सासरच्या मंडळींनी तिच्यावर अघोरी आणि अमानुष प्रकार केले. लग्नानंतर काही महिन्यांनीच तिच्या वागण्यात दोष असल्याचा आणि तिच्यावर भूतबाधा झाल्याचा कुटुंबीयांचा गैरसमज निर्माण झाला. त्यानंतर अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री नग्न अवस्थेत झोपण्यास भाग पाडले गेले. तिच्या शरीरावर लिंबू ठेवणे, राख फासणे, विविध अघोरी चाचण्या घेणे, अंगावर मंत्र पुटपुटणे असे प्रकार वारंवार घडू लागले. यामुळे तिच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम झाला.फिर्यादीत आणखी एका धक्कादायक गोष्टीचा उल्लेख आहे. विवाहितेस झालेलं मूल हे पतीचं नसून त्याची पितृत्त्व चाचणी करून अघोरी पद्धतीने सिद्ध करावी, असा अजब हट्ट सासरच्यांनी धरला. यामुळे विवाहितेची प्रचंड मानसिक कुचंबणा झाली. या सगळ्या प्रकारांनंतर तिने सासरी नांदण्यास स्पष्ट नकार दिला. हडपसर पोलीस ठाण्याने या प्रकरणी सासू, सासरे, पती आणि इतर संबंधित नातेवाईकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ अंतर्गतही कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, विवाहितेचे जबाब नोंदवले जात आहेत. काही पुरावेही पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.