Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डाएटिशियन ऋजुता दिवेकर सांगतात ५ पावरफुल फूड कॉम्बिनेशन! वजन होईल कमी - रहाल कायम फिट...

डाएटिशियन ऋजुता दिवेकर सांगतात ५ पावरफुल फूड कॉम्बिनेशन! वजन होईल कमी - रहाल कायम फिट...
 

सध्याच्या धावपळीच्या आणि सतत बिझी लाईफस्टाईलमध्ये फिट आणि हेल्दी राहण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे असते. आपल्यापैकी अनेकांना फिट आणि हेल्दी राहायचं असतं, पण नेमकं काय खावं आणि कसं खावं याबाबत गडबड गोंधळ उडतो. खरंतरं, आपण जे काही खातो, त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला - वाईट  परिणाम होतो. जर तुमचा आहार योग्य असेल, तर पचनक्रिया  चांगली राहते आणि बद्धकोष्ठता, वजन वाढणे आणि अनावश्यक खाण्याची इच्छा यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. यासाठी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहारात आरोग्यदायीअन्नपदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे असते प्रसिद्ध डाएटिशियन ऋजुता दिवेकर नेहमीच पारंपरिक आणि स्थानिक पदार्थांचे आहारातील महत्त्व सांगतात. त्यांच्या मते, महागड्या सुपरफूड्सपेक्षा आपल्या घरातील काही साधे पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास त्याचे आश्चर्यकारक फायदे शरीराला मिळतात.

प्रसिद्ध डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांनी नुकतेच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले आहे की, नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत आणि रात्रीच्या हलक्या स्नॅक्ससाठी अनेक आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत, जे पारंपरिक आणि पोटासाठी फायदेशीर आहेत. त्यांनी सांगितलेले ५ पावरफुल फूड कॉम्बिनेशन्स जर रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि एकूणच फिट राहण्यासाठी मदत होते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी असे कोणते ५ पावरफुल फूड कॉम्बिनेशन्स आहेत ते पाहूयात.
 
 
कोणते आहेत ५ पावरफुल फूड कॉम्बिनेशन्स...


१. शेंगदाणे आणि गूळ :-
शेंगदाणे आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अनेक शारीरिक समस्यांपासून बचाव होतो. शेंगदाणे व गूळ एकत्रित खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी करून धमन्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय, हे दोन्ही पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असल्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात की, शेंगदाणे आणि गूळ दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था मजबूत करण्यास आणि पचनक्रिया जलद करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि अनेक रोगांपासून बचाव होतो. शेंगदाण्यांमधील मोनोअनसॅचुरेटेड फॅट खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, तर गुळामधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

२. चणे आणि गूळ :-
शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आपण चणे आणि गुळा नेहमी खाऊ शकता. हे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि इतर अनेक पोषक तत्वांचे मिश्रण आहे, जे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, तुम्ही या दोन्ही पदार्थांना स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. चणे आणि गूळ दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असल्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते.
 
३. वरण-भात :-
दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही वरण-भात खाऊ शकता. हा एक पूर्ण आहार आहे आणि तो खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. वरण-भातामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि डाळीमधील प्रथिने हाडे, मेंदू आणि हार्मोनल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अनावश्यक भूक लागत नाही.

४. चिला आणि दही :-
चिला आणि दही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि आरोग्यदायी स्नॅकचा उत्तम पर्याय ठरू शकतो. या दोन्ही पदार्थांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन 'सी' असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनसंस्था निरोगी राहते. याशिवाय, यातील दही प्रोबायोटिक म्हणून कार्य करते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच, दही पोटाला थंडावा देते आणि मन तृप्त करणारा उत्तम पदार्थ आहे.

५. दही वडा :-
दही वडा तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासोबतच तुमचे पोट भरलेले ठेवू शकतो. हा एक प्रोबायोटिक पदार्थ आहे, जो पोटासाठी आरोग्यदायी आणि हायड्रेटिंग आहे. याव्यतिरिक्त, यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतात.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.