बापरे! बारावीच्या विद्यार्थ्याचं शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम; शिक्षेकेच्या घरी गेला अन् पेट्रोल शिंपडून शिक्षिकेला पेटवून दिलं
भोपाळ : मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात घडलेल्या एका थरारक घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यानं शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटवून देत जीवघेणा हल्ला केला. या घटनेत शिक्षिका सुदैवानं बचावल्या असून आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी साधारण 3.30 च्या सुमारास घडली. सूर्यांश कोचर (वय 18) असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून स्मृती दीक्षित (वय 26) असे जखमी शिक्षिकेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पेट्रोलनं भरलेली बाटली घेऊन स्मृती यांच्या घरी गेला. त्यानं त्यांच्यावर पेट्रोल शिंपडून त्यांना पेटवून दिलं आणि नंतर घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर भाजल्यामुळे स्मृती दीक्षित यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या 10 ते 15 टक्के भाजल्या आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या जीवाला धोका नाही.
आरोपी आणि शिक्षिका यांची ओळख गेल्या 2 वर्षांपासून होती. सूर्यांश कोचर याला स्मृती दीक्षित यांच्याविषयी एकतर्फी प्रेमभावना होती. याच कारणावरून त्यानं वारंवार वाद निर्माण केले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात स्मृती यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने शाळा प्रशासनाकडे त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आरोपीला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. या तक्रारीचा राग मनात धरून सूर्यांश कोचर यानं बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं.नरसिंहपूर पोलीस अधिकारी मनोज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सूर्यांश कोचरनं थंड डोक्यानं कट रचून स्मृती दीक्षित यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देत जीव घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एकतर्फी प्रेम आणि सूडभावनेतून घडला," असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून सूर्यांश कोचरचा शोध सुरु केला. अखेर डोंगरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणपूर गावातून त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 124 सह इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याची पुढील चौकशी सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.