Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नितेश राणेंनी मटका बुकीवर धाड टाकलीच, पोलीसांवरही भडकले; म्हणाले, 'पदभार घेताच इशारा दिला होता, आता...'

नितेश राणेंनी मटका बुकीवर धाड टाकलीच, पोलीसांवरही भडकले; म्हणाले, 'पदभार घेताच इशारा दिला होता, आता...'
 

कणकवली शहर बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्‍या एका मटका अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली होती. ही धाड पोलिसांनी नाही तर चक्क पालकमंत्री नितेश राणे यांनीच टाकल्याने मटका खेळणाऱ्यांसह पोलिसांची तारांबळ उडाली. नितेश राणे यांनी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धाड टाकत नंतर पोलीस प्रशासनाला बोलावले आणि सर्व आरोपींवर कडक कारवाई व्हायला हवी असा सज्‍जड इशारा दिला. दरम्‍यान मटका बुकिंग प्रकरणी महादेव रमाकांत घेवारी यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 2 लाख 78 हजार रूपयांची रोकडही जप्त केली. 
कणकवली शहरात गेली अनेक वर्षे बाजारपेठेच्या मागील बाजूस अंधारी चाळीसमोरील एक इमारतीमध्ये मटका कलेक्‍शन घेतले जाते. याबाबतची माहिती मिळताच नितेश राणे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकांसह सायंकाळी चारच्या सुमारास स्वतः त्‍या मटका अड्ड्यावर धाड टाकली. स्वतः पालकमंत्र्यांनी धाड टाकल्याने घेवारी आणि त्‍याच्या कर्मचाऱ्यांची बोबडी वळली. त्‍यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना घटनास्थळी बोलावून घेतले. या धाडीवेळी मटका खेळण्याच्या वह्या, लॅपटॉप, मटका बुकींगचे इतर साहित्‍य, टेबल, खुर्ची यांच्यासह 2 लाख 78 हजार 725 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

या कारवाई वेळी राणे यांनी थेट पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांना मोबाईलवरून फोन लावला. राणे म्‍हणाले की, आम्‍ही सिंधुदुर्गात मटका, जुगार आदी अवैध धंदे चालू देणार नाही. तसेच या सर्वांना पोलीस पाठबळ देत असतील पोलीस प्रशासनाचीही तक्रार गृहमंत्र्यांकडे करणार आहोत. यानंतर कणकवली पोलिसांनी मटका बुकी चालवणारे महादेव घेवारी (वय 65, रा.बाजारपेठ, कणकवली), मयुर मनोहर पांडव (वय 30, जानवली वाकाडवाडी), संदीप शंकर पडवळ (वय 46, कनकनगर), चंद्रकांत शंकर गवाणकर (वय 57, परबवाडी), प्रशांत शशिकांत घाडीगावकर (वय 43, रा.वरवडे, तांबळवाडी), महेश आत्‍माराम बाणे (वय 27, मधलीवाडी), अनिल श्रीपत पाष्‍टे (वय 48, कलमठ लांजेवाडी), सतीश विष्णू गावडे (वय 40, वागदे गावठाणवाडी), संतोष शंकर राठोड (वय 43, कलमठ गावडेवाडी), तुषार यशवंत जाधव (वय 42, वागदे सावरवाडी), महेश चंद्रकांत देवणे (वय 35, कणकवली बाजारपेठ) यांना ताब्‍यात घेतले आहे.
यावेळी राणे म्हणाले, ज्‍यावेळी पालकमंत्री पदाचा पदभार घेतला, त्‍याचवेळी सिंधुदुर्गातील अवैध धंदे बंद व्हायला हवेत असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले होते. एवढेच नव्हे तर कणकवली शहरातील घेवारी यांची यंत्रणा संपूर्ण जिल्ह्यातील मटका घेते. त्‍यामुळे घेवारी यांची चौकशी करा असेही निर्देश पोलीस प्रशासनाला दिले होते. परंतु पोलिसांनी आजवर या मटका अड्ड्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्‍यामुळे मला इथे येऊन धाड टाकावी लागली. दरम्‍यान आजच्या धाड सत्रात कुठलीही कुचराई होऊ देऊ नका. या गुन्हाचा तपास नीट करा. मटका बुकिंग प्रकरणी सर्वांवर कारवाई व्हायलाच हवी असा इशारा देखील राणे यांनी दिला. धाड सत्राच्या सुरवातीला केवळ एक लाख रूपयेच असल्‍याची माहिती घेवारी यांनी राणे यांना दिली. त्‍यानंतर राणे यांनी पोलिसांना झडती घ्यायला लावली. त्‍यावेळी एकूण 2 लाख 78 हजार 725 रूपयांची रोकड पोलिसांना मिळाली.
सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्‍याम आढाव यांनीही घेवारी यांच्या मटका सेंटरला भेट दिली. तसेच या घटनेचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असून सर्व आरोपींना ताब्‍यात घेण्यात आले आहे. पंचनामा कार्यवाही पूर्ण होताच सर्व आरोपींवर रीतसर गुन्हा दाखल होणार असल्‍याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली. दरम्‍यान पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः मटका केंद्रावर धाड टाकल्‍याच्या मुद्द्याची जोरदार चर्चा कणकवलीत होती. याबाबतचे वृत्त प्रसारीत होता. शहरातील मटका बुकिंग घेणाऱ्या सर्व टपऱ्या बंद करण्यात आल्या. तर सायंकाळी उशिरापर्यंत घेवारी यांच्या मटका केंद्राबाहेर विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.