Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृष्णा नदीकाठासह दंडोबा पर्यटन विकासावर लवकर आढावा बैठक, मंत्री शंभुराज देसाई ः पृथ्वीराज पाटील यांनी घेतली भेट

कृष्णा नदीकाठासह दंडोबा पर्यटन विकासावर लवकर आढावा बैठक, मंत्री शंभुराज देसाई ः पृथ्वीराज पाटील यांनी घेतली भेट
 

जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी काही केंद्रांचा चांगल्या पद्धतीने विकसीत करता येईल. राज्य पर्यटन मंत्रालय त्यासाठी पूर्ण सहकार्य करेल. चांदोली अभय आरण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कृष्णा नदीकाठ, दंडोबा डोंगर परिसर आदीचा विकास निश्चितपणे करूया. त्याबाबत तातडीने एक आढावा बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिली.

भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी तासगाव येथे रथोत्सवानंतर श्री. देसाई यांची गेस्ट हाऊसवर भेट घेतील. त्यांनी सांगली जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे प्रमुख मुद्दे त्यांच्यासमोर ठेवले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विजयसिंहराजे पटवर्धन, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासोबत गणेश चतुर्थीला पर्यटन विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली होती. हा विषय पृथ्वीराज पाटील यांनी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्यासमोर मांडावा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज भेट घेतल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने जिल्ह्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाला चालना द्यावी. त्यासाठी चांदोली अभय आरण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासोबतच कृष्णा नदीकाठ, दंडोबा डोंगर परिसर, संगीत नगरी मिरजेत मोठा वाव आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला. 
 
आमदार सत्यजीत देशमुख यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या चांदोली पर्यटन विकासाच्या प्रस्तावाला ताकद दिल्यास जिल्हा राज्य व देशाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे येईल. त्याच्या बरोबरीने सांगलीतील श्री गणपती मंदिराच्या निमित्ताने धार्मिक पर्यटन, कृष्णा नदीवर साहसी जलक्रीडा व्यवस्था निर्माण करणे, साबरमती नदीच्या धर्तीवर दोन्ही काठांचा विकास करणे, कृष्णामाई महोत्सव; संगीत नगरी मिरजेत तंतुवाद्य निर्मितीचे पर्यटनाच्या दृष्टीने ब्रँडिंग, दंडोबा डोंगर विकासाचा सुनियोजित आराखडा बनवणे आदी मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्रातील पर्यटनाला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. सांगलीत जिथे संधी असेल तेथे आपण पर्यटन विकासाला चालना देऊ. त्यासाठी पर्यटन मंत्रालय संपूर्ण सहकार्य करेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.