पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवणार याबाबत महाविकास आघाडीचं चित्र अद्याप पुरेस स्पष्ट झालेलं नाहीये, तर दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये मैत्रिपूर्ण लढती होऊ शकतात, मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय हा महायुतीच असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.मात्र या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कल्याणमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते. या पक्षप्रवेशावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आलं.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. कल्याण डोंबिवलीला लागलेलं विकासाचं ग्रहण दूर करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचा महापौर येणे अत्यंत गरजेचे आहे, कल्याण डोंबिवली भाजपमय करायचे आहे त्यासाठी सगळ्यांनी जोमाने कामाला लागा, असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाची देखील मोठी ताकद आहे. मुख्यमंत्र्यांकडून महापालिका निवडणुका या महायुती म्हणून लढवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.