पोलिसांनी तब्बल 10 कोटींचं ड्रग्ज केलं जप्त; अभियंता, विदेशी,
दंतवैद्यकीय विद्यार्थ्यासह 7 जणांना अटक, कुठून खरेदी करायचे ड्रग्ज?
बंगळूर : येथे सीसीबी पोलिसांना सात ड्रग्ज तस्करांना अटक करून त्यांच्याकडून ९.९३ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात यश आले आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन विदेशी, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एक डेंटल (दंतवैद्यकीय) विद्यार्थ्याचा समावेश आहे. तसेच तीन किलो ८५८ ग्रॅम एमडीएमए क्रिस्टल, ४१ ग्रॅम एक्स्टसी गोळ्या, एक किलो ८२ ग्रॅम हायड्रोकॅन्नबिस, सहा किलो गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि दुचाकी जप्त केल्याची माहिती शहर पोलिस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, अटक केलेल्या आरोपींमध्ये लक्कासंद्रा येथे राहणारा नायजेरियन नागरिक केविन रॉजर (वय ३०), कल्याणनगर येथे भाड्याच्या घरात राहणारा थॉमस नवीद चीम (३३) आणि रणजित अँथनी मॅथ्यू (३२), मंगळूर (दक्षिण कन्नड) येथील मोहम्मद शंपीर (वय २०) आणि दोड्डाबळ्ळापूर येथील सुरेश यांचा समावेश आहे.महादेवपूर येथे ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी एका व्यक्तीला अटक केली. त्याने कबूल केले की, तो खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि तो केरळमधून स्वस्तात हायड्रोकॅन्नाबीस खरेदी करत होता आणि अधिक पैसे कमविण्यासाठी तो ओळखीच्या लोकांना जास्त किमतीत विकत होता. त्याच्याकडून ५०० ग्रॅम हायड्रोकॅनाबीज आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार,दुचाकी आणि मोबाईल फोनसह ७५ लाखांची मालमत्ता जप्त केली.
दंतवैद्यकीय विद्यार्थ्याला अटक
अडुगोडीजवळील छाप्यात एका ड्रग्ज तस्कराला अटक केली. तो डेंटलचा (दंतवैद्यकीय) विद्यार्थी आहे. त्याने हायड्राकॅन्नबीस खरेदी केल्याची आणि अधिक भावाने लोकांना विकल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून ३२ लाखांचे ३०० ग्रॅम हायड्रोकॅन्नाबीस जप्त केले.
तीन जणांना अटक
तीन ड्रग्ज तस्करांबद्दल सविस्तर माहिती मिळाल्यानंतर अडुगोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकण्यात आला. त्यांना अटक करून सहा लाखांचे ड्रग्ज जप्त केले. पोस्ट ऑफिसमध्ये परदेशी स्रोताकडून प्रतिबंधित ड्रग्जचे पार्सल आल्याची माहिती मिळाल्यानंतर के. जी. नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकला आणि एक किलो २२ ग्रॅम हायड्रो गांजा आणि एक कोटींचे इतर ड्रग्ज जप्त केले.
जामीन मिळूनही तस्करीत
२०२२ मध्ये एनसीबी युनिटमध्ये त्याच्याविरुद्ध एनडीपीएसचा गुन्हा दाखल केला होता, पण तो जामिनावर सुटला. आणखी एक आरोपी २०१९ मध्ये विद्यार्थी व्हिसावर भारतात आला होता. गुजरातेतील सायबर क्राइम पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल होते. जामीन मिळाल्यानंतर तो दिल्लीत फरार होता. तो दोन महिन्यांपूर्वी बंगळूरला आला होता आणि ड्रग्ज तस्करीत सहभागी होता. त्याच्या ताब्यातून तीन किलो ८५८ ग्रॅम एमडीएमए क्रिस्टल, ४१ ग्रॅम ८२ एक्स्टसी गोळ्या आणि गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या इतर वस्तू जप्त केल्याचे सिंह यांनी सांगितले.
दोन परदेशी तस्करांना अटक
हेब्बागोडीजवळ ड्रग्ज तस्करीत सहभागी असलेल्या दोन परदेशी नागरिकांना अटक केली. त्यांनी एमडीएमए क्रिस्टल आणि एक्स्टसी गोळ्या खरेदी करून त्या ग्राहकांना जास्त किमतीत विकल्याची कबुली दिली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक २०१९ मध्ये मेडिकल व्हिसावर भारतात आला होता. तो दिल्लीत राहणाऱ्या परदेशी नागरिकांकडून ड्रग्ज खरेदी करून बंगळूरमधील ग्राहकांना विकत असे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.