सांगलीत लोकसभेला बंडखोरीने ग्रासलेला काँग्रेस पक्ष विधानसभेवेळी वाचू शकला नाही. बंडखोरी, अंतर्गत कलह आणि विविध कारणामुळे काँग्रेसला गळती लागली. आधी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा तथा मदन पाटील गटाच्या नेत्या आणि वसंतदादा घराण्याच्या नात सून जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडला. त्या पाठोपाठ 11 वर्षे जिल्हाध्यक्ष (शहर) म्हणून पद सांभाळणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. यामुळे सांगलीत काँग्रेसची अवस्था दयनीय झालीय. यातून काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी माजी मंत्री विश्वजीत कदम आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी कंबर कसली असून नव्या जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीसाठी चाचपणी सुरू केली. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले असून लवकरच सांगली काँग्रेस शहराच्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती होणार आहे. याला मुहूर्त ही मिळाला आहे. पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी 27 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. याच बैठकीत नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
जयश्रीताई पाटील यांनी विधानसभेवेळी झालेल्या पराभव, काँग्रेसमध्ये परतीचे बंद झालेली दारे यामुळे थेट निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसने आपल्यावर अन्याय केल्याचे आरोप करत थेट मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांची नियुक्त जिल्हा नियोजनवर झालीच सोबत वसंतदादांचे रखडलेल्या स्मारकाच्या कामाला निधीही आला. यामुळे खासदार विशाल पाटील यांना जे जमलं नाही ते जयश्रीताईंनी करून दाखवलं अशी चर्चा सुरू झाली.
अशातच जयश्रीताईंवर टीका करण्यासह आरोप
करण्याची संधी न सोडणारे पृथ्वीराज पाटील हे देखील भाजपच्या नावेच स्वार
झाले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर आरोप केले नाहीत. पण भाजप आमदार सुधीर
गाडगीळ यांचा चिमटा काढत ते आपल्याला सोबत घेतील अशी आशा व्यक्त केली.
मात्र त्यांच्या जाण्याने शहर अध्यक्षाची पोकळी काँग्रेसमध्ये निर्माण
झालीय. याचे कारण 11 वर्षे त्यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली होती. या
काळात कोणाला शहर अध्यक्ष व्हावे अशी इच्छाच निर्माण झाली नाही. तसा पर्याय
तयार झाला नाही.
पण आता काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या आधी पाटील यांच्या जाग्यावर पर्याय शोधावा लागणार आहे. तशी चाचपणीही पूर्ण झाली आहे. सध्या प्रा. सिंकदर जमादार, राजेश नाईक, फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, मयुर पाटील आणि अय्याज नायकवडी असे चेहरे शहराध्यक्षाच्या शर्यतीत आहेत. यापैकीच एकाची आता शहराध्यक्ष पदी नियुक्ती होणार आहे. यादरम्यान खासदार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी सांगली शहर काँग्रेस कमिटीत पदाधिकारी आणि जेष्ठ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ज्यात पदाधिकारी आणि जेष्ठ कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी अनेकांनी ऐन वेळी डांग मारणाऱ्यांविषयी आपली नाराजी बोलून दाखवत जोरदार टीका केली.यावेळी कदम आणि पाटील यांनी गेलेल्यांच्यावर चर्चा न करता आपण आता असणाऱ्यांनी काँग्रेसच्या मजबुतीकडे लक्ष द्यायला हवं असे सांगितले. त्यांनी संतापलेल्या पदाधिकाऱ्यांना शांत केले. तसेच अनुभवी आणि पक्षासाठी 24 तास वेळ देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडेल असे सुतोवाच केले. यानंतर आता शहराध्यक्षासाठी पाच ते सहा जणांची नावे चर्चेत आहेत.
कोणाला मिळणार संधी?
सध्या काँग्रेसच्या शहराध्यक्षाच्या शर्यतीत पाच ते सहा नावे चर्चेत आहेत. ज्यात काँग्रेसचे जुने-जाणते नेते माजी आमदार विष्णुआण्णा पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे प्रा. सिंकदर जमादार यांचे पहिले नाव आहे. जमादार हे काँग्रेसमधील जुने नाव असून शहराची नाळ, जिल्ह्यासह शहरातील काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची ओळख असणारे नाव आहे. सध्या त्यांच्याकडे काँग्रेस ग्रामीण उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.
माजी नगरसेवक राजेश नाईक हे देखील इच्छुक असून ते देखील माजी आमदार विष्णुआण्णा पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. नाईक शहराच्या कोपऱ्यां कोपऱ्याशी परिचीत असून त्यांना महापालिकेच्या राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. माजी नगरसेवक अय्याज नायकवडी यांचेही नाव शहराध्यक्षाच्या शर्यतीत असून ते खासदार प्रकाशबाबू पाटील यांचे एकनिष्ठ समर्थक आहेत. पण यांचे कार्यक्षेत्र हे मिरज आहे. त्यामुळे नायकवडी मागे पडू शकतात, अशा राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.शहराध्यक्षाच्या शर्यतीत माजी मंत्री मदन पाटील यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक फिरोज पठाण यांचेही नाव आहे. ज्यावेळी जयश्रीताई भाजपमध्ये गेल्या यावेळी अनेक माजी नगरसेवक त्यांच्याबरोबर गेले. मात्र पठाण यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. ही त्यांची जमेची बाजू असली तरीही त्यांचा संपर्क ठराविक आहे. माजी नगरसेवक मयुर पाटील हे देखील शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. मात्र ते पक्षासाठी 24 तास देणार का? कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना न्याय देणार का हाच मोठा प्रश्न त्यांच्या नावासमोर आहे.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद उत्तम प्रकारे सांभाळलेले माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांचेही नाव शहराध्यपदाच्या रेसमध्ये आहे. त्यांचाही संपर्क शहरातील जनतेशी चांगला असून ते पक्षाची धूरा सांभाळू शकतात अशी चर्चा आहे. पण नव्या-जुन्यांच्या समतोल सांभाळून काँग्रेसला पुर्वपदावर आणण्यासह आगामी स्थानिकच्या तोंडावर उभारी देणाऱ्या नावालाच पसंती काँग्रेसचे प्रदेशाध्य आणि स्थानिक नेते देणार आहेत. आता हे नाव कोणाचे? विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांची कोणाला पसंती आहे? हे सध्या गुलदस्त्यात असून 27 तारखेला पुण्यात ते समोर येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.