कोल्हापूर :- सासरवाडीहून घरी येताना वाटेत पत्नीचा खून; रस्त्यावरच हातोडा अन् कोयत्याने केले वार
सासरहून पत्नीला घेऊन येताना पतीने वाटेत मोटारसायकल थांबवून तिचा निर्घृण खून केला. हा प्रकार सोमवारी रात्री आठच्या दरम्यान उघडकीस आला आहे. पेठवडगाव - कोरेगाव रस्त्यावर पतीने पत्नीवर कोयत्याने वार केले आणि डोक्यात हातोड्याने जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात सौ. रोहिणी प्रशांत पाटील (वय २९) हिचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, यातील संशयित व पती प्रशांत मारुती पाटील (३४, रा. भादोले) पळून गेला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत पेठवडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः भादोले (ता. हातकणंगले) येथील प्रशांत मारुती पाटील ऊर्फ गुंडा याचे ग्रामपंचायती समोर मोटारसायकलचे गॅरेज आहे. त्याचे सासरे आजारी असल्यामुळे पत्नी रोहिणी ही ढवळी (ता. वाळवा) येथे माहेरी गेली होती. तो संध्याकाळी मोटारसायकलवरून तिला घेऊन येण्यासाठी गेला होता. माहेरून पत्नीला घेऊन प्रशांत पेठवडगाव - कोरेगाव रस्त्यावरून घरी येत होता.भादोलेपासून दोन किलोमीटर आधी त्याने अचानक एका शेताजवळ गाडी थांबविली. यावेळी त्याने पत्नीला कोयता व हातोड्याने डोक्यात व गळ्यावर सपासप वार केले. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा खून करून तो घरी परतला. घरात आल्यानंतर त्याने वडिलांना पत्नीचा खून केल्याचे सांगितले आणि त्यानंतर तेथून तो पळून गेला.दरम्यान, वडिलांनी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी हातोडा, कोयता व चटणीची पुडी मिळाली आहे. पेठवडगावचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते. याशिवाय मोबाईल फॉरेन्सिक लॅब घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांनी घटनास्थळीचा पंचनामा केला. मृतदेह नवे पारगाव आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.