सांगलीत विमानतळ उभारणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक :– आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा व्हिडिओद्वारे सहभाग
सांगली दि.30 - सांगली जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विमानतळ उभारणीच्या प्रश्नावर आज मौजे कवलापूर येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा.ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा झाली.
बैठकीस आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला.
या बैठकीत उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत यांनी सांगलीतील मौजे कवलापूर परिसर विमानतळ उभारणीसाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देत सांगितले की, विजिबिलीटी रिपोर्टच्या आधारे विमानतळाची योजना शक्य आहे, तसेच अतिरिक्त जमिनीची गरज असल्यास सरकार ती अधिग्रहित करून विमानतळ प्रकल्पासाठी उपलब्ध करून देईल.
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपल्या मतप्रदर्शनात सांगितले की सांगली-मिरज विधानसभा क्षेत्र हे उद्योग, शेती, शिक्षण व आरोग्य उपचार यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले गेले आहे. त्यामुळे या विमानतळामुळे प्रवास व वाहतूक सुलभ होईल आणि उद्योगधंद्यांना नवे बळ मिळेल.
बैठकीत पुढील पायाभूत कामांबाबत सखोल चर्चा झाली असून, सर्व प्रलंबित मुद्द्यांवर मार्ग काढून ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार आहे.
या बैठकीस खासदार श्री. विशाल पाटील, आमदार सुरेश (भाऊ) खाडे, आमदार सुहास बाबर, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी अशोक काकडे व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.