पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणामुळे राज्यभरात वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील विविध भागात आंदोलकांकडून आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा परिणाम पुण्यातही पाहायला मिळाला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुण्यातील दौऱ्याआधी पुण्यातील मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सिंहगड रोड उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यादरम्यान अनेक मंडळांच्या गणेश मूर्तींचं दर्शन घेण्याची शक्यता आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही मराठा आंदोलक कार्यक्रमाच्या रस्त्यार जमले होते. या आंदोलकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.पुण्यातील सिंहगड रोड उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर उतरले आहेत. सिंहगड रस्त्याकडून राजाराम पुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. याच लोकार्पण कार्यक्रमाच्या जवळ असलेल्या ठिकाणाहून काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
कोणत्या पुलाचं होणार उद्घाटन?
पुण्यातील सिंहगड रोडवरील पुलाचं आज उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहगड रोडवरील उद्यान पुलाचं उद्घाटन होणार आहे. पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपुल वाहतुकीसाठी आजपासून खुला होणार आहे. फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावरील २.५ किलोमीटर उड्डाणपूलाचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील उपस्थिती असणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.