सतत कोसळणाऱ्या पावसामुळे लातूरकर आधीच अडचणीत आहे. शेतात अन् घरात पाणी असल्याने लातूरमधील शेतकरी आधीच संकटात सापडलाय. त्यात मंगळवारी रात्री लातूरमधील मुरूडला भूकंपाचे सौम्य धक्के जाणावले. अचानक जमीन हादरू लागल्यामुळे लोकांची पळापळ झाली. बाहेर पावसाने सर्व होत्याचे नव्हते केलेय, संकटात सापडलेल्या लातूरकरांना भूकंपाच्या धक्क्याने दुहेरी संकटात टाकले. मुरूडमधील लोकांनी रात्री घराबाहेर पळ काढला. सौम्य धक्के असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केले.
लातूर जिल्ह्यातल्या मुरुड अकोला परिसरात रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.3 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे . दरम्यान भूकंपाचा केंद्रबिंदू हा लातूर शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या मुरुड आकोला परिसरात आहे. भूकंपाची खोली ही 5 किलोमीटर पर्यंत आहे. तर भूकंपाची सौम्य नोंद असली तरी नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आव्हान प्रशासनाच्या वतीने केलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कच्च्या घरात न राहता सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः नदीकाठची शेती पिके संपूर्ण पाण्यात वाहून गेली आहेत. लातूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज करणार आहेत. दुपारी दीड वाजता ते हेलिकॉप्टरने औसा येथे येतील. त्यानंतर औसा तालुक्यातील उजनी या ठिकाणच्या पूर परिस्थितीची पाहणी आणि शेती पिकांची पाहणी करतील. त्यानंतर निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरातील नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी करणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.