Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत भाजप नेत्यांची भाऊबंदकी चव्हाट्यावर! स्थानिकच्या रणधुमाळीत विधानसभेच्या घोषणेनं नवा ट्विस्ट

सांगलीत भाजप नेत्यांची भाऊबंदकी चव्हाट्यावर! स्थानिकच्या रणधुमाळीत विधानसभेच्या घोषणेनं नवा ट्विस्ट
 

सांगलीत सध्याच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती म्हणत स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. याचदरम्यान जिल्ह्यातील कडेगावमध्ये मात्र भाजपच्या दोन महत्वाच्या नेत्यांमधील भाऊबंदकी चव्हाट्यावर आली आहे. दोघांनी एकमेकांवर उट्टे काढले असून एकानेतर विधानसभेची आपली उमेदवारी घोषणा करत मीच विधानसभा लढणार असे म्हटले आहे. हा वाद कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथे भाजप राज्य व जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीवर निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कारावेळी पाहायला मिळावा. यामुळे सांगली भाजपच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.

भाजपचे नेते तथा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या चुलत बंधुंमध्ये सध्या भाऊबंदकी सुरू झाली आहे. दोन्ही भावांनी एकमेकांवर टीकास्त्र डागत आपले राजकीय मार्ग वेगळे झाल्याची घोषणाच केली आहे. संग्राम यांनी 'बाता मारणारे' अशा शब्दांत पृथ्वीराज यांची खिल्ली उडवली आहे. तर यावर पलटवार करताना पृथ्वीराज देशमुखांनी मी जर डोळा मारला असता तर लाखानं कार्यक्रम झाला असता आता 'मीच विधानसभा लढवणार', अशी घोषणा करून उघड उघड आव्हान दिले आहे. ज्यामुळे सांगलीचे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.
 
काही मंडळी हा मंत्री खिशात, तो मंत्री खिशात अशा बाता मारत फिरत आहेत. पण भाजप नेहमीच काम करणाऱ्याला संधी देत असतो. सर्वसामान्य जनता ही काम करणाऱ्याच्या पाठीशी ठाम उभी असते. तेव्हा कार्यकर्त्यांनी अशा मंडळींच्या बोलण्याकडे लक्ष न देता पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावीत, असा टोला संग्रामसिंह देशमुख यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे नाव न घेता लगावला होता. ते बोलत होते.
 
2 नगरसेवक कोठडीत, खून, गुन्हेगारीमुळे भाजप स्वतःच राजकीय जाळ्यात अडकला
 
यावेळी संग्राम देशमुख यांनी, 'भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून आपण या पक्षाचे पदाधिकारी आहोत. विधानसभेला पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेवटच्या घटकांतील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळे एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार आहे. सर्वसामान्य जनता ही काम करणाऱ्याच्या पाठीशी ठाम उभी असते, हे आपण कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी पाहिले आहे. पक्ष संघटना बांधणीकडे लक्ष द्या, असेही आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना यावेळी केले.

संग्राम देशमुख यांनी केलेल्या टीकेनंतर कडेगावसह सांगलीचे वातावरण चांगलेच तापलेलं होते. यानंतर पृथ्वीराज देशमुख यांनी संग्राम देशमुखांवर पलटवार करताना, अण्णांच्या रक्ताचा नव्हे, कामाचा वारसा महत्त्‍वाचा असतो, असे म्हणत पृथ्वीराज देशमुख यांना डिवचले. त्यांनी, मी, हा मंत्री खिशात, तो मंत्री खिशात, असे मी कधीही म्हटलेलो नाही आणि म्हणतही नाही. त्यामुळे बोलणाऱ्याने असले धंदे बंद करावेत. प्रतिकूल परिस्थितीत हाडाची काडं करून संघटना उभारली असून पक्ष आपण वाढवला आहे. त्यात संपतराव अण्णांच्या नावाचे योगदान मोठे आहे. मात्र संपतराव अण्णांचा वारसा कामातून सिद्ध होतो, रक्तानं नाही, अशी खोचक टीका पृथ्वीराज देशमुख यांनी केली.

पृथ्वीराज देशमुख म्हणाले, 'देशमुख कुटुंबात जन्मलो, कार्यकर्त्यांनी ताकद दिली म्हणून तीस वर्षे संपतराव अण्णांचे नाव टिकवून ठेवले. ताकारी, टेंभू सिंचन योजनांच्या कामांना गती दिली. भाऊ मोठा व्हावा म्हणून संधी दिली. जिल्हा बँक, जिल्हा परिषद येथे ताकद लावून पदे दिली. पण भावाने काय केलं? संपतराव अण्णांनी राजकीय पाया घातला, तो पाया मजबूत करून पुढे जाण्याचे काम मी केलं. आतापर्यंत खूप संयम ठेवला होता. ज्यांनी मला विरोध केला, त्यांच्याशी तुमची दोस्ती म्हणजे तुमच्या मनात नेमकं आहे, तरी काय? सन 2019 ला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून तुम्ही भाजपला दोष देत राहिलात. मला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, तेव्हा मात्र पक्षाचे काम करावे लागेल, असे म्हणालात. मीही भाजपमध्येच आहे.

मी कार्यकर्त्यांचा रात्री एक वाजताही फोन उचलणारा सामान्य कार्यकर्ता आहे. पण तुम्ही दुपारीही देखील फोन उचलत नाहीसा. मग माणसं कशी सोबत राहणार? विधानसभेला पार्टीचे मी चोखपणे काम केले. तरीही माझ्याबाबत अप्रचार करत केला. स्वतः मागे राहून घर एकत्र ठेवायचा बराच प्रयत्न केला. मला शिव्या देऊन फार काळ तुमचे दुकान चालणार नाही. 'आगे आगे देखो होता है क्या.' आता विधानसभा मीच ताकदीने लढवणार अशीही घोषणा पृथ्वीराज देशमुखांनी केली आहे. त्यांची ही घोषणा म्हणजे संग्राम देशमुखांना उघड आव्हान मानले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.