सांगली : प्रेमात भान हरपलेल्या तरुण-तरुणींकडे कोणते कृत्य केले जाईल, याचा नेम नसतो. सांगलीमध्ये अशीच एक विचित्र घटना उघडकीस आली असून एका तरुणाने प्रेयसीला वाढदिवसाची भेट देण्यासाठी जबरी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरीप्रकरणी पार्श्व माणगावकर आणि
हृषीकेश पाटणे या दोन आरोपींना अटक झाली आहे. त्यांनी वनिता रहाटे नावाच्या
वृद्ध महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याचं उघड झालं आहे. या
दोन्ही आरोपींना पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. न्यायालयाने
दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ
उडाली आहे.
प्रेयसीला वाढदिवशी भेटवस्तू देण्यासाठी जबरी चोरी केल्याप्रकरणी अटक केलेल्या पार्श्व अनिल माणगावकर (वय १९, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) व हृषीकेश मोहन पाटणे (२२, रा. हरिपूर, ता. मिरज) या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, पार्श्व माणगावकर याच्या प्रेयसीचा वाढदिवस असल्यामुळे तिला भेटवस्तू देण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने हरिपूर येथील मित्र हृषीकेश पाटणे याच्या मदतीने चोरी करण्याचा कट रचला. हरिपूर येथील वनिता रामचंद्र रहाटे (वय ७०) ही वृद्ध महिला घरात एकटीच असताना पार्श्व हा पाणी पिण्याचा बहाणा करून घरात आला. त्यानंतर त्याने रहाटे यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांची सोन्याची माळ आणि कर्णफुले असा १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून पलायन केले. दरम्यान, याबाबत रहाटे यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रं फिरवत आरोपींचा शोध सुरू केला होता. अखेर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक कारवाई केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.