समाज माध्यमावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची एक चित्रफीत ( व्हिडीओ) व्हायरल झाली आहे. आझाद मैदान या उपोषणस्थळी जरांगे पाटील हे समोसा खात असताना या चित्रफितीत दाखवण्यात आले आहे. ही चित्रफीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून तयार करण्यात आली आहे. परंतु या प्रकारामुळे आंदोलक चांगलेच संतापले असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मुंबईच्या आझाद मैदानात मराठा समाजाचे निर्णायक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे करत आहेत. त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. शुक्रवार २९ ऑगस्ट पासून जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. सोमवारी त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. राज्याच्या विविध भागातील मराठा समाजाचे लोक या आंदोलनात सामील होत आहेत.
जरांगे पाटील समोसा खात होते…?
जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. ओबीसी ( इतर मागासवर्गीय ) कोट्यातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार भले त्यासाठी मरण आले तरी चालेल, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. या मागणीसाठी त्यांनी अन्नत्याग सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमावर ( सोशल मीडिया ) एक चित्रफित प्रसारित झाली आहे. या चित्रफितीत मनोज जरांगे पाटील चक्क समोसा खात असताना दाखवण्यात आले आहेत. ही चित्रफीत ९ सेकंदाची आहे आणि अगदी खरी वाटावी अशी आहे. मात्र ही चित्रफीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार करण्यात आली आहे.
बदनामीचा कट असल्याचा आरोप
हा प्रकार हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया एका आंदोलकाने दिली. जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केले जाते, हा इतिहास आहे. ही बनावट चित्रफीत त्याचाच एक भाग असल्याचे एका आंदोलकाने सांगितले. भाजपाच्या आयटी सेलमधून हा बनावट व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याची शंका एका आंदोलकाने व्यक्त केली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार केली जाणार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
सध्या मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. आंदोलकांनी सरकारची कोंडी केली आहे. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आंदोलकांनी संयम बाळगावा विरोधकांच्या हातात कोलीत देऊ नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्च्यातर्फे करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.