Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! 'महागणपती रांजणगाव देवस्थानाचे ६५ एकर क्षेत्र गायब';थेट राज्यपालांकडे तक्रार, देवस्थान ट्रस्टही खडबडून जागे

Breaking News ! 'महागणपती रांजणगाव देवस्थानाचे ६५ एकर क्षेत्र गायब';थेट राज्यपालांकडे तक्रार, देवस्थान ट्रस्टही खडबडून जागे


शिक्रापूर: अष्टविनायकांपैकी महागणपती रांजणगाव देवस्थानाच्या नावे असलेल्या ढोक सांगवी (ता. शिरूर) येथील तब्बल ६५ एकर जमीन क्षेत्र सातबारा उताऱ्यावरून गायब असून, याबाबत राज्यपालांकडे तक्रारदार शिवाजी असवले यांनी दाद मागितली आहे.

याबाबत केलेल्या तक्रारीनुसार, शिरूरचे तहसीलदार यांनी मंडलाधिकाऱ्यांच्या करवी चौकशी करून अहवाल तयार केला असून, तो पुढील कार्यवाही मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. सदर ६५ एकर क्षेत्र हे वतन रजिस्टरमध्ये नोंदीत आहे. मात्र, ते देवस्थानच्या मालकीहक्कपत्रातून गायब झाले असून, या सर्व क्षेत्रांचे जे वेगळ्याच खासगी नावाने नोंदीत आहेत, त्या सर्व नोंदी पोकळीस्त (नोंदी कशाच्या आधारावर केल्या गेल्या याचा उल्लेख नसणे) आहेत. या प्रकरणी रांजणगाव देवस्थान ट्रस्टही धर्मादाय उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाहीसाठी जाणार आहेत.



रांजणगाव येथील महागणपती देवस्थानच्या मालकीचे ढोकसांगवी येथील असलेले ६५ एकर क्षेत्र हे गायब असल्याची तक्रार सध्या शिक्रापुरात राहत असलेले निवृत्त लष्करी अधिकारी शिवाजी असवले यांनी मे २०२४ मध्ये शिरूर तहसील कार्यालयाकडे, जिल्हाधिकारी व थेट राज्यपालांकडे तक्रार केली. तब्बल वर्षभराच्या पाठपुराव्यानंतरही त्यांना दाद गेली नाही. अखेर राज्यपाल कार्यालयाने शिरूर तहसिल कार्यालयाला सूचना पत्र दिले आणि कार्यवाही सुरू झाली. त्यानुसार ढोकसांगवी येथील जुना सर्व्हे नं.५४ मधील नवीन गट नं.३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७० व ३७१, तसेच जुना सर्व्हे नं.५५ मधील नवीन गट नं.४०४, ४०५, ४०६ व ४०७ या शिवाय जुना सर्व्हे नं. ५६मधील नवीन गट नं. ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२ व ४१३ मिळकत एलआर नं.१६ नोंदवहीतील (वतन रजिस्टर) नोंदीनुसार इनामवर्ग ३ नुसार रांजणगाव देवस्थानच्या नावाने नोंदीत आहेत. मात्र सन १९२७ मध्ये कढईपत्रक होताना व त्यानंतर ७/१२ नोंदी होताना देवस्थानचे इनाम वर्ग तीन नुसारची नोंद रद्द होत, भलत्याच नावांचे ७/१२ उतारे तयार होऊन हे सर्व क्षेत्र इनाम वर्ग १ म्हणून सध्या नोंदीत आहे.

वास्तविक देवस्थान जमिनी इनामवर्ग १ (खासगी) होत नसताना त्या कशा झाल्या (दान, खरेदीखत, बक्षीसपत्र, शासन आदेश, संस्था परवानगीची कुठेही नोंद नाही) त्याचा उल्लेखच नसल्याने त्या पोकळीस्त नोंदी झाल्याचे आक्षेपही तक्रारदार यांनी आपल्या अर्जात ठेवले. मात्र त्यांच्या अर्जाला कुणीच किंमत दिली नाही. पर्यायाने सद्यःस्थितीत हे सर्व ६५ एकर क्षेत्र हे रांजणगाव देवस्थानच्या मालकी-ताब्यातून गायब असून ते तत्काळ देवस्थानला वर्ग करण्यासाठीचा पाठपुरावा असवले करीत असल्याची माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. हर्षल गोसावीयांनी दिली.

रांजणगाव देवस्थानचे ६५ एकर क्षेत्र जर गायब असेल वा ते देवस्थानचे असूनही ते आमच्याकडे प्राप्त नसेल; तर याबाबत आम्ही या प्रकरणाची सर्व माहिती संकलित करून हे प्रकरण धर्मादाय उपायुक्तांकडे सादर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व क्षेत्र पुन्हा देवस्थानला प्राप्त करून घेण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करू.

- स्वाती पाचुंदकर, अध्यक्षा, रांजणगाव देवस्थान ट्रस्ट

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तक्रारदाराशी संपर्क साधला असता त्यांच्या वतीने वकील अ‍ॅड. हर्षल गोसावी यांनी सदर प्रकरणाची संपूर्ण माहिती देताच आम्ही या प्रकरणासाठी मंडलाधिकारी नेमून सर्व जुन्या कागदपत्रांची-नोंदींची पडताळणी केली. यात वतन रजिस्टरमध्ये तक्रारदार म्हणतात, तशा नोंदी आहेत. मात्र, कढईपत्रक आणि पुढे ७/१२मध्ये त्या कशा आल्या नाहीत अन् त्याचे वेगळे ७/१२ कसे बनले, याची माहिती उपलब्ध होत नसल्याने हे सर्व प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करू.

- बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, शिरूर

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.