Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! पूरग्रस्तांना शासनाकडून फक्त गहू-तांदूळ अन् तूर डाळच; शासनाच्या किटमध्ये तेल, मीठ, तिखट, चहा-साखर नाहीच; 'एनजीओ'कडून भागवाभागवी

Breaking News ! पूरग्रस्तांना शासनाकडून फक्त गहू-तांदूळ अन् तूर डाळच; शासनाच्या किटमध्ये तेल, मीठ, तिखट, चहा-साखर नाहीच; 'एनजीओ'कडून भागवाभागवी
 
 
सोलापूर : पूरग्रस्त कुटुंबांना तूर डाळ, मीठ, तेल, साखर, चहा, गहू, तांदूळ व स्वयंपाकाची भांडी असे कीट देण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली. पण, शासनाच्या आदेशानुसार पूरग्रस्तांसाठी सध्या दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ दिले जात आहे. आता दोन-तीन दिवसांनी पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला तीन किलो तूरडाळ दिली जाणार आहे. याशिवाय तेल- मीठ, चहा-साखर अशा जीवनावश्यक वस्तू मात्र शासनाकडून नव्हे तर 'एनजीओ'कडूनच घेऊन दिले जात आहे.

नैसर्गिक आपत्तीत आपत्तीग्रस्तांना नेहमीप्रमाणे शासनाच्या वतीने १० किलो तांदूळ व तेवढेच गहू दिले जातात. शासनाने आता पूरग्रस्तांना तीन किलो तूर डाळ देण्याचाही नवा निर्णय घेतला आहे. मात्र, तूर डाळ स्थानिक बाजारातून खरेदी करण्यास सांगितले असून, खरेदीपूर्वी दरपत्रक घेऊन डाळ खरेदी करावी लागणार असल्याने त्यासाठी वेळ लागणार आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांसाठी उपलब्ध धान्य कमी पडणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातून ८० टन गहू व तेवढचे तांदूळ अतिरिक्त देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटपासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आली, पण त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे एनजीओंना आवाहन करून त्यांच्या मदतीने गहू, तांदूळ व तूर डाळीशिवाय अन्य वस्तूंचा पुरवठा पूरग्रस्तांना केला जात आहे.

शासनाच्या नियमानुसार वाटप सुरू
शासनाच्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबांना दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू देत आहोत. प्रत्येक कुटुंबाला तीन किलो तूर डाळ देखील दिली जाणार असून त्याचे वाटप लवकरच सुरू होईल.

- संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर

दिवाळीपूर्वी धान्य येईल का?

ऐन दिवाळीच्या तोंडावर रेशन दुकानांमधील धान्य पूरग्रस्तांसाठी वळविण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्याचे म्हणजेच दिवाळीचे रेशन धान्य यायला अजून वेळ असल्याने पूरग्रस्तांसह इतर ग्राहकांना रेशन धान्यासाठी वाट पहावी लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी (सोलापूर शहर वगळून) दरमहा नऊ हजार ६०० टन धान्य लागते. पण, जिल्ह्यातील पुरामुळे ऑक्टोबरमध्ये वाढीव गहू व तांदूळ द्यावा, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे.

पुरवठा अधिकारी म्हणतात...
पंचनामे अजूनही पूर्ण नसल्याने पूरग्रस्तांना नेमके किती धान्य लागेल याचा अंदाज येईना.

शासनाच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना १० किलो तांदूळ व तेवढेच गहू दिले जाईल.

प्रत्येक कुटुंबाला तीन किलो तूर डाळ देण्याचा निर्णय, पण दरपत्रक घेऊन स्थानिक बाजारातून डाळ खरेदीला वेळ लागेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.