राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!परीक्षेचा अर्ज
भरण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ, DCM शिंदेंनी शिक्षण मंत्र्यांना दिले
निर्देश
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचा मोठा फटका शालेय विद्यार्थांना बसला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने वाहतूक कोडींची समस्या ऐरणीवर आली आहे. अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेचा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत.याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना फोन करून या समस्येबाबत चर्चा केली. बारावीच्या परीक्षेसाठी मुदवाढ देण्याचे निर्देश शिंदे यांनी भुसे यांना दिले आहेत.
राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली होती.परंतु, मराठवाडा,नाशिक,सोलापूर,अहिल्यानगर आणि राज्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यास अडचणी येत होत्या.त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अर्ज वेळेवर भरणे शक्य होत नव्हते. अशातच अनेक विद्यार्थ्यांनी,पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली.शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भुसे यांनी राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यासाठी सांगितलं. त्यानंतर शिक्षण विभागाने अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं. तसच बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदतवाढ 15 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.