दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी जोरात सुरू असते. बाजारात ऑफर्सचा पाऊस पडत असतो जसे की "0 % मेकिंग चार्ज", "हॉलमार्क फ्री गोल्ड" अशा जाहिरातींची रेलचेल असते.
पण या आकर्षक ऑफर्सच्या आड एक मोठं आर्थिक गणित दडलेलं असतं, ज्यामुळे ग्राहकांच नुकसान होतं. इन्व्हेस्टमेंट बँकर सीए सार्थक अनुजा यांनी लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये हे धक्कादायक सत्य मांडलं आहे. त्यांनी सांगितलं की ज्वेलर्स "0 % मेकिंग चार्ज"च्या नावाखाली ग्राहकांकडून अनेक लपलेले चार्ज वसूल करतात. या 'छुप्या कमाई'च्या पाच पद्धती त्यांनी सांगितल्या आहेत.
1. सोन्याचा भाव वाढवून आकारलेले अतिरिक्त पैसे
ग्राहक गूगलवर पाहिलेल्या सोन्याच्या भावावर आधारित भाव गृहीत धरतात. पण अनेक ज्वेलर्स प्रति ग्रॅम 200 रुपयांपर्यंत जास्त आकारणी करतात. उदाहरणार्थ, तुम्ही 50 ग्रॅम सोनं घेतलं, तर बिलात सुमारे 10,000 रुपयांचा अतिरिक्त खर्च जोडला जातो. म्हणजेच जवळपास 2% 'हिडन चार्ज' तुमच्या लक्षात न येता बिलात दिले जातात.
2. वेस्टेज चार्जचा खेळ
सोनं तयार करताना काही प्रमाणात धातू वाया जातो, पण वास्तवात ते प्रमाण फक्त 2-3% असतं. तरीही काही ज्वेलर्स "अवघड डिझाइन"चं कारण देऊन 5% वेस्टेज चार्ज आकारतात. धक्कादायक म्हणजे हा चार्ज सध्याच्या वाढलेल्या सोन्याच्या भावावर लावला जातो, त्यामुळे बिल आणखी वाढतं.
3. स्टोनच्या किंमतीत फसवणूक
"0 % मेकिंग चार्ज" असलेल्या दागिन्यांमध्ये अनेकदा हिरे, पन्ना किंवा इतर स्टोन्स बसवलेले असतात. पण या स्टोन्सची किंमत बाजारभावापेक्षा अनेक पट जास्त दाखवली जाते, ज्यामुळे ग्राहकाला मेकिंग चार्ज माफ असला तरी एकूण किंमत वाढतेच.
4. बायबॅकच्या वेळी नुकसान
काही ज्वेलर्स सोनं परत विकताना "90% बायबॅक व्हॅल्यू" देण्याचं आश्वासन देतात. पण 0 % मेकिंग चार्जच्या ऑफरमध्ये ही रक्कम 70-80% पर्यंत खाली येते. त्यामुळे जेव्हा ग्राहक दागिने परत विकायला जातो, तेव्हा त्याचं मोठं नुकसान होतं.
5. घाऊक भावाचा फायदा न देणे
ज्वेलर्स मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्यामुळे त्यांना घाऊक दरात सूट मिळते. पण हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात नाही. उलट बाजारभावातच विक्री करून अधिक मार्जिन कमावलं जातं.
ग्राहकांनी काय करावं?
सार्थक अनुजा यांच्या म्हणण्यानुसार, सोनं खरेदी करण्यापूर्वी BIS Care अॅपवर HUID कोड तपासावा. हा कोड हॉलमार्किंग सिस्टममधून सोन्याची शुद्धता तपासण्यास मदत करतो.
त्यांनी सल्ला दिला की सोनं खरेदी करताना -
बिल नीट तपासा,
दरांची तुलना करा,
आणि शुद्धतेचा पुरावा मागा.
कारण "0% मेकिंग चार्ज"चं आमिष दिसायला चांगल वाटत असलं, तरी त्यामागचे अतिरिक्त चार्ज तुमच्या खिशावर भारी पडू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.