Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली:'शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करू': आयुक्तांचा इशारा; देशी झाडे लावण्याच्या मागणीसाठी आंदोलन

सांगली:'शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करू': आयुक्तांचा इशारा; देशी झाडे लावण्याच्या मागणीसाठी आंदोलन
 

सांगली: 'महापालिका क्षेत्रात देशी-स्थानिक प्रजातीचीच झाडे लावावीत,' या मागणीसाठी गेले बारा दिवस शहरातील विविध पर्यावरणवादी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. आज आयुक्त सत्यम गांधी यांना भेटीसाठी वेळ मागतिली असता त्यांनी चर्चा न करता थेट, 'तुम्ही शासकीय कामात अडथळा आणता, तुमच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील,' अशा शब्दांत इशारा दिला. 
 
आयुक्तांच्या या वर्तनामुळे कार्यकर्ते दुःखी झाले. त्यांनी यापुढे आंदोलनाची व्याप्ती अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. रवळ ग्रुप, तसेच कृष्णा महापूर समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले. दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल. आज आंदोलनात रोहन पाटील, तबरेजखान, कौस्तुभ पोळ, अनिकेत ढाले, अजित पाटील, कृष्णा कोरे आदी सहभागी झाले.

पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रवीण शिंदे म्हणाले, ''आम्ही कार्यकर्ते रोज आयुक्तांच्या कार्यालयात जातो. उपस्थित अधिकाऱ्यांना देशी प्रजातीचे रोप भेट देतो. नेहमीप्रमाणे आजही आंदोलन झाले. गेले काही दिवस आम्ही रोज येतो; मात्र कोणीही दखल घेत नाही. आज आम्ही आयुक्त सत्यम गांधी यांच्या चर्चेसाठी वेळ मागितली.  आयुक्तांनी अर्धा तास ताटकळत ठेवले. ते दालनाबाहेर आल्यानंतर त्यांना आपली भूमिका सांगण्यासाठी आम्ही गेलो असता आयुक्त संतापले. त्यांनी आमच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांची नावे व मोबाईल क्रमांक घ्या आणि त्यांच्यावर पोलिस फिर्याद दाखल करा, असे आदेश स्वीय सहायकांना दिले. त्यानंतर आम्हीच पुढे होत स्वतःहून नावांची यादी बनवून आयुक्त दालनातील अधिकाऱ्यांकडे दिली; मात्र त्यांनी ती यादी स्वीकारास नकार दिला. आयुक्तांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीने आम्ही व्यथित आहोत. आम्ही आयुक्तांकडून काही वैयक्तिक लाभाच्या गोष्टी मागत नाही. आमची मागणी इतकी आहे की, सुमारे एक लाख विदेशी वृक्ष लावणार आहात. त्यामुळे पर्यावरणाचा फायदा नव्हे, तर नुकसान होणार आहे. ''

ते म्हणाले, ''आम्ही पालिका क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत विदेशी वृक्ष लागवड करू देणार नाही. प्रशासनाने विदेशी झाडांवर पैसा न खर्च करता देशी गुणवत्तापूर्वक झाडे लावावीत. आम्ही त्यासाठी सर्वोतोपरी मदत देऊ. सुमारे तीन कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा पैसा जनतेचा आहे. देशी प्रजातीवर पक्ष्यांचे जगणे अवलंबून असते. ती एक परिसंस्था आहे. त्याचे भान ठेवले पाहिजे. कोणाच्या हट्टापायी आवडतील ती झाडे लावता येणार नाहीत. आम्ही सर्व त्या स्तरावर त्याचा विरोध करणार आहोत.''

जोपर्यंत शंभर टक्के देशी प्रजातीची झाडे लावली जातील, अशी हमी आयुक्त देणार नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. राज्यभरातून पर्यावरणवादी कार्यकर्ते महापालिकेसाठी देशी प्रजातीची रोपे पाठवत आहेत. आम्ही ती त्यांना देत राहू. धमक्या देऊन आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. आमची मागणी बेकायदेशीर असेल तर जरूर गुन्हे दाखल करा.

- कौस्तुभ पोळ, कार्यकर्ते

आयुक्त जी झाडे लावण्यासाठी निघाले आहेत त्याचे पर्यावरणीय परिणाम काय होतील, याचा कोणताही अभ्यास झालेला नाही. जुन्या झाडांसोबत नवी झाडे लावणे चुकीचे आहे. जास्त पाणी शोषणारी, परागकणांनी ॲलर्जी येणारी, स्थानिक पशुपक्ष्यांना उपयोगी नसणाऱ्या झाडांचे पर्यावरणाचे परिणाम मूल्यांकन केले आहेत का? आमची मागणी साधी सरळ आहे. देशी प्रजातींची झाडे लावा.

- रोहन पाटील, देवराई अभ्यासक



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.