नाशिक हादरले! व्यसनी मुलाने जन्मदात्या आईचा केला निर्घृण खून
सातपूर- नाशिक: शहरातील खून सत्र थांबण्याचे नाव घेईना, असे सध्या नाशिक शहरातील चित्र आहे. सातपूर कॉलनीत व्यसनाधीन मुलाने जन्मदात्या आईचा निर्घृण खून केल्याने सातपूर परिसर हादरला. स्वत:च पोलिसासमोर जात अज्ञाताने आईला मारल्याचा बनाव रचणाऱ्या मुलास पोलिसांनी सखोल चौकशीअंती अटक केली आहे.
मृत महिला या निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी होत्या. मंगला संतोष घोलप-गवळी (वय ६४, रा. सातपूर कॉलनी, सातपूर) असे आईचे, तर स्वप्नील संतोष घोलप (३४) असे संशयित मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ६) घोलप मायलेकांमध्ये वाद झाला होता. संशयित स्वप्नील हा मद्य आणि गांजाच्या आहारी गेला होता. त्यावरून त्यांच्याच सतत वाद होत होते. मंगळवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास वादातून संशयित स्वप्नील याने आई मंगला यांचे डोके टेबलावर आदळले.
टेबलावरील टोकदार वस्तू त्यांच्या डोक्यात घुसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. सकाळी संशयित स्वप्नील हा स्वत: सातपूर पोलिस ठाण्यात आला आणि त्याने रात्रीच्या वेळी अज्ञाताने आईला मारल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहता सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मंगला घोलप या जागेवर मृत झालेल्या असल्याने पोलिसांचा स्वप्नीलवरच संशय बळावला. त्यास ताब्यात घेत चौकशी केली.
परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे, युनिट दोनचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी सातपूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे तपास करीत आहेत.
असा झाला उलगडा
संशयित स्वप्नीलने चौकशीत आपण काहीही केलेले नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घोलप यांच्या घराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात संशयास्पद असे काहीही आढळून आले नाही. मृत मंगला घोलप या निवृत्त असल्याने त्यांना चांदणी खान या जेवणाचा डबा देत होत्या.
त्यांच्याकडेही पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी संशयित स्वप्नील हा व्यसनी असून, मायलेकात सतत वाद होत असल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर पोलिसांनी स्वप्नीलकडे मोर्चा वळविला आणि पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली.
संशयित नौदलातून बडतर्फ
संशयित स्वप्नील हा नौदलात नोकरीला होता; परंतु त्यास बडतर्फ करण्यात आले होते. त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती. त्यातच त्याला मद्य आणि गांजाचे व्यसन जडले होते. त्यावरून मायलेकात सतत वाद होत होते. मंगला घोलप यांनी यापूर्वी सातपूर पोलिसांत दोन-तीन वेळा मुलगा स्वप्नील मारहाण करीत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.