बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीचे काम हाती घेतले होते. काम आता पूर्ण झाले असून आयोगाकडून आज अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली. या प्रक्रियेवर विरोधकांकडून सुरूवातीपासून आक्षेप घेण्यात येत होता. लाखो मतदारांना या प्रक्रियेमुळे मतदारयादीतून वगळले जाऊ शकते, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. अखेर अंतिम मतदारयादीकडे पाहिल्यास विरोधकांची ही भीती खरी ठरली आहे.
निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदारयादीमध्ये ७ कोटी ४२ लाख मतदारांचा समावेश आहे. जुन्या मतदारयादीतून तब्बल ६८.५ लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. मतदारांचा आकडा ६ टक्क्यांनी कमी झाला आहे. जून महिन्यात बिहारमधील मतदारांची संख्या ७.८९ कोटी एवढी होती. SIR नंतर हा आकडा कमी झाला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तात्पुरती मतदारयादी जाहीर केली त्यावेळी ६५ लाख मतदारांना वगळण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत आणखी ३.६६ लाख मतदारांना वगळण्यात आले. तर नव्याने २१.५३ लाख मतदारांचाही समावेश यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम मतदारसंख्या ७.४२ कोटींवर पोहचली आहे.अंतिम मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतर आता विरोधक आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. मतदार वगळल्याचा फटका कोणत्या पक्षाला बसणार, यावरही आता विविध मतदारसंघातील राजकीय गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून प्रत्येक मतदारसंघनिहाय वाढलेल्या, कमी झालेल्या मतदारांच्या संख्येवर विचार केला जाऊ शकतो.विरोधकांनी एसआयआरविरोधात सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केल्या आहेत. त्याची कोर्टाने दखल घेतली असून आतापर्यंत काही सुनावण्याही झाल्या आहेत. कोर्टाने नोंदणीसाठी आधार कार्ड गृहित धरण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार काही दिवसांपासून नोंदणीही सुरू झाली होती. पण त्यानंतरही यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांचा आकडा अधिक असल्याचे दिसते.
मतदारयादीतून
वगळण्यात आलेले मतदार नेमके कोणते आहेत, याबाबत आयोगाने माहिती दिलेली
नाही. मृत झालेले, पत्ताबदल, दुबार नोंदणी, राज्य बदल, नाव कमी करण्याचा
अर्ज देऊनही नोंदणी असलेले, नागरिकत्वाचा कोणताही ठोस पुरावा नसलेले आदी
मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे. पण त्यांची आकडेवारी अद्याप समोर
आलेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.