Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बिहार निवडणुकीच्या प्रचारातून राहुल गांधी गायब! काँग्रेसची वेगळी रणनीती चर्चेत, भाजप संधीचा घेणार फायदा?

बिहार निवडणुकीच्या प्रचारातून राहुल गांधी गायब! काँग्रेसची वेगळी रणनीती चर्चेत, भाजप संधीचा घेणार फायदा?
 

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. तर, दुसरीकडे महागठबंधनचा प्रमुख चेहरा तेजस्वी यादव हेही जोमाने प्रचार करत असले, तरी ते एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. कारण, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी अद्याप बिहार प्रचारात दिसलेले नाहीत. निवडणुकीच्या तारखा अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही राहुल गांधींची अनुपस्थिती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे.

राहुल गांधी शेवटचे १ सप्टेंबर रोजी बिहारमध्ये दिसले होते. त्यांनी त्या वेळी मतदार हक्क यात्रेत सहभागी होत मत चोरण्याच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर मात्र त्यांनी बिहारकडे पाठ फिरवली आहे. काँग्रेस या निवडणुकीत ६१ जागांवर लढत आहे, तर राजदने १४३ जागांवर उमेदवार दिले आहेत. राहुल गांधी बिहारला आले तेव्हा जागावाटप निश्चित झाले नव्हते, तसेच उमेदवारांच्या निवडीबाबतही कोणताही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

राजदच्या सूत्रांनी या अनुपस्थितीमागे एक ठरलेली रणनीती असू शकते, असे सूचित केले आहे. काही काँग्रेस नेत्यांनीही हे वास्तव गुप्तपणे मान्य केले आहे. उत्तर प्रदेशातील एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, "राहुल गांधी प्रचारात उतरले की निवडणूक थेट 'राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी' अशी बनते. अशा स्थितीत मोदींच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे काँग्रेसच्या प्रचाराचा परिणाम कमी होतो. त्यामुळे यावेळी पक्ष निवडणूक 'तेजस्वी यादव विरुद्ध नितीश कुमार' अशी ठेवू इच्छितो."

त्यामुळे राहुल गांधी सध्या प्रचारापासून जाणीवपूर्वक दूर राहिले आहेत. ते पुढे काही सभा घेतील, पण या वेळी फार सक्रिय राहणार नाहीत. प्रियंका गांधीदेखील काही ठिकाणी प्रचार करणार असल्या तरी महागठबंधनचा मुख्य चेहरा तेजस्वी यादवच राहणार आहेत. दरम्यान, एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार मोहीम राबवली आहे. विरोधी आघाडीच्या वतीने मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादवही राज्यभर सभांच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. तर, जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर सुद्धा बिहारमध्ये प्रभावी प्रचार करताना दिसत आहेत. काँग्रेसमध्ये मात्र तिकीट वाटपातील असंतोष आणि संघटनात्मक गोंधळामुळे वातावरण तणावग्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचे प्रचारातून दूर राहणे हा पक्षासाठी एक चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.