Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवसेनेचा अंतर्गत सर्व्हे, भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लावणारा एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव, महापौरपदाचं स्वप्न भंगणार?

शिवसेनेचा अंतर्गत सर्व्हे, भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लावणारा एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव, महापौरपदाचं स्वप्न भंगणार?

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांना भारतीय जनता पक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे.

तिन्ही पक्ष एकत्रित लढताना जागावाटपावरुन मोठी रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरु केली असून भाजपकडे पहिला प्रस्ताव मांडला जाण्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबई महापालिकेत २२७ जागा असून शहरात शिवसेना आणि भाजप यांचं प्राबल्य आहे. त्यामुळे मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी अधिक जागांचा आग्रह धरण्याची शक्यता कमी आहे. किंबहुना राष्ट्रवादी आपापल्या पॉकेट्समध्ये स्वबळावर लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजपला कुठल्याही परिस्थितीत स्वतःचा महापौर मुंबईवर बसवायचा आहे. त्यासाठी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याची गरज आहे. त्यासाठी निम्म्याहून कैक जास्त जागा लढवाव्या लागतील. भाजप १६० ते १७५ जागांसाठी आग्रही आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या प्रस्तावाने महायुतीत खळबळ उडू शकते.

एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे उमेदवार निवडण्यासाठी पक्षांतर्गत सर्व्हे सुरु केला आहे. निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन तिकीट वाटप केले जाणार आहे. परंतु जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती शिवसेनेत आहे. पक्षातील इच्छुक आणि माजी नगरसेवकांची संख्या पाहून ११० ते ११४ जागांचा प्रस्ताव शिवसेना भाजपकडे ठेवण्याची शक्यता आहे. २२७ जागा असलेल्या मुंबई महापालिकेचा बहुमताचा जादूई आकडाच ११४ आहे. अशात शिंदेंच्या मागणीवर भाजपची भूमिका पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची काय स्थिती?

२०१७ ते २०२२ या काळात मुंबई महापालिकेत नगरसेवकपद भूषवलेल्या ६२ माजी नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आहे. तर २०१७ पूर्वीचे ६५ माजी नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये शिवसेना ३२, भाजप २, काँग्रेस १९, राष्ट्रवादी २, मनसे ६, सपा १, अपक्ष ३ अशी नगरसेवकांची संख्या आहे.

दुसरीकडे, २०१७ ते २०२२ या काळातील काँग्रेसचे ७, मनसेचा एक, सपाचे दोन, एमआयएमचे दोन माजी नगरसेवकही शिवसेनेसोबत आहेत. मुंबईतील एकूण १२५ हून अधिक माजी नगरसेवक शिवसेनेत आहेत. नाराजी, बंडखोरी, फूट टाळत या सर्वांना सामावून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना ११० हून अधिक जागा लढवण्याची नितांत गरज आहे. मात्र भाजपची यावर काय प्रतिक्रिया असणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.