जपानमध्ये हंगामी फ्लूने थैमान घातले आहे. देशभरात इन्फ्लुएंझाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. आरोग्य मंत्रालयाने अखेर देशव्यापी "महामारी स्थिती" घोषित केली आहे. अनेक प्रांतांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर रुग्णालयांवर रुग्णांचा ताण वाढला आहे. दरवर्षीप्रमाणे जपानमध्ये फ्लूचा हंगाम डिसेंबर-जानेवारीत सुरू होतो. मात्र यंदा तो पाच आठवडे आधी आला आहे. तज्ज्ञांच्या मते, या वर्षीचा व्हायरस अतिशय झपाट्याने "म्युटेट" होत आहे आणि नवीन वातावरणाशी तात्काळ जुळवून घेत आहे.
जपानच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २२ पासून सुरू झालेल्या आठवड्यात देशातील नियुक्त वैद्यकीय केंद्रांमध्ये ४,०३० रुग्णांना फ्लूचे उपचार करण्यात आले. मागील आठवड्याच्या तुलनेत ही संख्या ९५७ ने अधिक आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की हा आकडा पुढील आठवड्यांमध्ये आणखी वाढू शकतो. अनेक भागांतील रुग्णालये पूर्ण भरली आहेत. विशेषतः मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये संसर्गाचा धोका अधिक असल्याने शाळा व महाविद्यालये तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. बाजारपेठांमध्येही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध लादले आहेत.होक्काईदो युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या प्राध्यापिका योको त्सुकामोटो यांनी सांगितले, या वर्षी फ्लूचा हंगाम खूप लवकर सुरू झाला आहे. बदलत्या जागतिक वातावरणामुळे असे प्रकार वारंवार होण्याची शक्यता वाढत आहे.त्याच विद्यापीठातील संशोधक साकामोटो म्हणाले, "जपानमध्येच नव्हे तर जगभरात फ्लू विषाणूमध्ये अशी प्रतिकारशक्ती वाढताना दिसते आहे. लोकांच्या वाढत्या स्थलांतरामुळे व्हायरस नव्या ठिकाणी पोहोचत आहे आणि वेगवेगळ्या वातावरणात तो अधिक अनुकूल बनत आहे.या वर्षी केवळ जपानच नव्हे, तर इतर देशांमध्येही फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. संशोधकांच्या मते, कोविडनंतर पर्यटन व आंतरराष्ट्रीय प्रवासात वाढ झाल्याने लोक आणि विषाणू दोन्ही सीमारेषा ओलांडत आहेत. सीमा तपासणी अधिक कडक करण्यात आली असून, विमानतळांवर प्रवाशांची तपासणी सुरू आहे. आवश्यक असल्यास काही शहरांमध्ये अंशतः लॉकडाऊन किंवा कर्फ्यू लागू करण्याची तयारी केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.