Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!
 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. यानुसार आता, जर तुम्हाला टोल प्लाझावर घाणेरडे शौचालय दिसले आणि त्याबाबत जर NHAI ला त्याची तक्रार केली, तर तुम्हाला FASTag रिचार्जच्या स्वरूपात १ हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. ही योजना देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू असेल. तर ही योजना फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या किंवा देखभाल केलेल्या शौचालयांबाबतच लागू असणार आहे. पेट्रोल पंप, ढाबे किंवा इतर खासगी सार्वजनिक ठिकाणांवरील शौचालयांचा यामध्ये समावेश नसेल.

या योजनेअंतर्गत, महामार्गावरील प्रवासी 'राजमार्गयात्री' अॅपच्या नवीन आवृत्तीचा वापर करून घाणेरड्या शौचालयांचे जिओ-टॅग आणि टाइम-स्टॅम्प केलेले फोटो अपलोड करू शकतात. याचबरोबर त्यांना त्यांचे नाव, स्थान, वाहन नोंदणी क्रमांक आणि मोबाइल नंबर देखील नोंदवावा लागेल. नंतर याबाबतच्या पडताळणीनंतर तक्रार योग्य आढळल्यास, संबंधित वाहनाला एक हजाराचे FASTag रिचार्ज बक्षीस म्हणून करून दिले जाईल. तर या योजनेअंतर्गत संपूर्ण कालावधीत प्रत्येक वाहन नोंदणी क्रमांकाला केवळ एकदाच बक्षीस मिळणार आहे. तसेच, एका शौचालयाच्या फोटोचा दिवसातून एकदाच बक्षीसासाठी विचार केला जाणार आहे. जर एकाच शौचालयाबाबत अनेक तक्रारी आल्यातर, फक्त पहिल्या योग्य तक्ररीसच बक्षीस दिले जाणार आहे.

 
याशिवाय एनएचएआयने स्पष्ट केले आहे की अॅपद्वारे घेतलेले फक्त स्पष्ट, मूळ आणि जिओ-टॅग केलेले फोटो वैध असतील. डुप्लिकेट, जुने किंवा एडिट केलेले फोटो स्वीकारले जाणार नाहीत. सर्व तक्रारी एआयचा वापर करून आणि प्रत्यक्षरित्या पडताळल्या जातील, जेणेकरून फक्त योग्य तक्रार करणाऱ्यांनाच या योजनेअंतर्गत बक्षीस मिळू शकेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.