Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रकाश आंबेडकरांचे दलित IAS, IPS अधिकाऱ्यांना 3 प्रश्न; उत्तर 'नाही' असेल तर...

प्रकाश आंबेडकरांचे दलित IAS, IPS अधिकाऱ्यांना 3 प्रश्न; उत्तर 'नाही' असेल तर...
 

हरियाणातील आयपीएस वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येनंतर वादळ उठले आहे. जातीभेद आणि मानसिक छळामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दलित आयएएस, आयपीएस तसेच उच्च पदांवरील इतर अधिकाऱ्यांना तीन प्रश्न विचारत सावध केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दलित आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांची आत्महत्या म्हणजे, शहरी भागात जातीय भेदभाव आता अदृश्य राहिलेला नाही, याचा पुरावा आहे. वाय. पूरन कुमार यांची पत्नी आयएएस अधिकारी आहे. पण त्यानंतरही पूरन जातीभेदापासून वाचू शकले नाहीत.
आंबेडकरांनी दलित आयएएस, आयपीएस अधिकारी, प्राध्यापक, इंजिनिअर यांच्यासह सरकारमधील उच्च पदांवरील अधिकाऱ्यांना तीन प्रश्न विचारले आहेत. तुम्हाला अजूनही आंबेडकरवादी चळवळीची गरज वाटत नाही का, असा आंबेडकरांचा पहिला प्रश्न आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीने तुम्हाला जातीभेदापासून सुरक्षित केले, असे तुम्हाला अजूनही वाटते का, हा आंबेडकरांचा दुसरा प्रश्न आहे. 
 
आंबेडकरांनी तिसरा प्रश्न आंबेडकरवादी राजकीय पक्षांबाबत केला आहे. तुम्ही अजूनही आंबेडकरवादी पक्षांना दुर्लक्षित करत राहणार का?, असा सवाल आंबेडकरांनी केला आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नाही, अशी असतील तर तुम्ही स्वत: आंबेडकरवादी आंदोलनामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे.

आंबेडकरवादी पत्रकारिता आणि राजकारणात योगदान देण्याबाबतही आंबेडकरांनी सूचित केले आहे. पुढे त्यांनी अधिकाऱ्यांना सतर्कही केले आहे. तुमच्या मुला-मुलींनाही या चळवळीशी जोडण्यासाठी, चळवळीत योगदान देण्यासाठी तयार करा, अन्यथा त्यांनाही तोत जातीय अन्याय सहन करावा लागेल, असे आंबेडकरांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये केले आहे.
दरम्यान, आयपीएस पूरन यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचे आरोप करताना यातून आपला मानसिक छळ केल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी अनेकदा लेखी तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही, असेही पूरन यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. आत्महत्येप्रकरणी चंदीगढ पोलिसांनी 13 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.