Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सीएम देवेंद्र फडणवीसांची थेट सातारा एसपींना फोनाफोनी, बलात्कारी PSI गोपाल बदने तत्काळ निलंबित; SP तुषार दोशी काय काय म्हणाले?

सीएम देवेंद्र फडणवीसांची थेट सातारा एसपींना फोनाफोनी, बलात्कारी PSI गोपाल बदने तत्काळ निलंबित; SP तुषार दोशी काय काय म्हणाले?
 

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने तिच्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात दोन जणांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली आहे. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे.

SP तुषार दोषी काय म्हणाले?
याबाबत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे. तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे. दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे. तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाल बदने याला निलंबित करत आहोत. या दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोपींना तात्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दोन्ही आरोपी फरार; रुपाली चाकणकरांची माहिती

याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या की, घडलेली घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची मी माहिती घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केलेले आहेत. यामधील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. हे दोघेही फरार आहेत. त्यांच्या तपासासाठी दोन पथक तयार करण्यात आलेले आहेत. पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तर या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी समोर येतील आणि तपास करणे सोयीचे ठरेल. परंतु घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. रक्षकानेच असे कृत्य करावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामधील आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

Pankaj Bhoyar: काय म्हणाले पंकज भोयर?
तर गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, फलटण येथील उपजिल्हा कार्यालयातील महिलेने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोट सापडली आहे. त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. सातारा पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा झाली आहे. त्यांना तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल. जो अहवाल येईल त्यात ज्या कोणाचा सहभाग असेल त्यावर देखील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.