Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये; अजित पवारांनी, पार्थ पवारांनी हा झोल महाराष्ट्राला सांगावा! - अंबादास दानवे

1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये; अजित पवारांनी, पार्थ पवारांनी हा झोल महाराष्ट्राला सांगावा! - अंबादास दानवे


राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एक मोठे प्रकरण समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 1 लाखांचे भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्यूटी लावण्यात आली असून सरकारी नियम वाकवून ही खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याच संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत अजित पवारांनी, पार्थ पवारांनी हा झोल महाराष्ट्राला सांगावा, अशी मागणी केली.


उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे. दानवे पुढे म्हणतात की, गंमत तर पुढे आहे.. एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतनाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!

दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००! फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र! असा घणाघात दानवे यांनी केला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.