स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय; १२२ पैकी ९१ जागा बिनविरोध जिंकल्या, काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव
देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपाने आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत असताना सत्ताधारी पक्षाने केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.
दादरा नगर हवेली आणि दीव दमण येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने १२२ पैकी तब्बल ९१ जागा (सुमारे ७५%) बिनविरोध जिंकल्या आहेत. काँग्रेसने मात्र या निवडणुकीवर आक्षेप घेतला असून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपाने निवडणूक आयोगाशी संगनमत करून या निवडणुका ‘हायजॅक’ केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या आरोपानुसार, या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षातील सुमारे ८० टक्के उमेदवारांचे नामांकन अर्ज फेटाळण्यात आले, त्यामुळेच भाजपाच्या अनेक उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दादरा नगर हवेली आणि दीव दमण येथील उर्वरित जागांसाठी आज, बुधवारी निवडणूक होणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
भाजपाने किती जागांवर मिळवला विजय?
केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४८ जिल्हा परिषदेच्या जागांपैकी ३५ जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.हा आकडा पक्षाच्या मागील नऊ वर्षांच्या कामगिरीच्या तुलनेत तिप्पट आहे.तसेच ४४ ग्रामपंचायतींपैकी ३० आणि ३० नगरपालिकेच्या जागांपैकी २६ जागांवर भाजपाने बिनविरोध विजय मिळवला आहे.२०२० साली या प्रदेशांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीच्या १५० जागांपैकी ८४ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आणि त्यापैकी ४७ जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या होत्या.मात्र, नोव्हेंबर २०२० मध्ये करोना काळात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने प्रदेशातील सर्व स्थानिक संस्था आपल्या ताब्यात घेतल्या होत्या, असे पक्षातील एका सूत्रांनी सांगितले.
कोणकोणत्या ठिकाणी भाजपाचा विजय?
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दमण जिल्हा परिषदेच्या १६ पैकी १० जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
तर दमण नगरपालिकेच्या १५ पैकी १२ वॉर्डात आणि १६ पैकी १० ग्रामपंचायतींवर भाजपाला बिनविरोध विजय मिळाला.
दीव जिल्ह्यात आठपैकी पाच जिल्हा परिषदेच्या जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला.
तसेच झोलावाडी आणि बुचरवाडा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपानेच बाजी मारली.
दादरा आणि नगर हवेली जिल्ह्यात २६ पैकी २० जिल्हा परिषद जागांवर, १५ पैकी १४ नगरपालिकेच्या वार्डांवर आणि २६ पैकी १८ ग्रामपंचायतींवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले.
निवडणूक अधिकाऱ्यांनी २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रे दिल्याचे सांगितले जाते.
भाजपाच्या नेत्यांचा दावा काय?
या विजयानंतर केंद्रशासित प्रदेशातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेश आगारी म्हणाले, "आम्ही तीन महिन्यांपूर्वीच या निवडणुकांची तयारी सुरू केली होती. पक्षातील प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना हाताशी धरून सर्वत्र जोरदार प्रचार केला. भाजपाने सर्वेक्षण करून इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आणि त्यांच्या प्रतिमेनुसार तिकीट वाटप केले होते, त्यामुळेच आम्हाला एकतर्फी विजय मिळवता आला. दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे केंद्रशासित प्रदेशाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी या निवडणुकांवर आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या ८०% उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक फेटाळण्यात आल्याने भाजपाचे उमेदवार विजय झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने नेमका काय आरोप केला?
दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ठाकरे म्हणाले, "निवडणूक आयोगाने १० ऑक्टोबरला निवडणुकांची घोषणा केली होती. आमच्या हातात उमेदवारांचे नामांकन अर्ज भरण्यासाठी केवळ सात दिवस होते. पहिले दोन दिवस अर्जच उपलब्ध नव्हते आणि आवश्यक कागदपत्रांची यादीही दिली गेली नाही. १४ आणि १५ ऑक्टोबरला आम्हाला कागदपत्रांची यादी मिळाली. आमच्या समितीने सर्व उमेदवारांचे नामांकन अर्ज तपासले आणि त्यात कोणतीही चूक आढळली नाही." ठाकरे पुढे म्हणाले, "निवडणूक आयोगाने जाणीपूर्वक नामांकन अर्ज तपासणीचे ठिकाण शेवटच्या क्षणी बदलले. आमचे उमेदवार जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना नामांकन अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती देण्यात आली. फक्त काँग्रेस नव्हे, तर अपक्षांसह इतर पक्षांच्या उमेदवारांचेही नामांकन अर्ज बाद करण्यात आले. भाजपाचा मात्र एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही."
निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात धाव
दरम्यान, भाजपाने निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने केंद्रशासित प्रदेशातील निवडणूक प्रक्रिया ‘हायजॅक’ केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पक्षाने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे, भाजपाने मात्र काँग्रेसला न्यायालयात जाण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. “निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्याचे काही नियम आहेत. या नियमांची पूर्तता न केल्यास निवडणूक अधिकारी संबंधित उमेदवाराचा नामांकन अर्ज बाद करू शकतात. उमेदवारांना त्या विरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे,” असे एका निवडणूक अधिकाऱ्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.