केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर शाह यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली आहे. इतकेच नाही तर भाजपा मुस्लीम उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट का देत नाही याबाबतही त्यांनी खुलासा केला. नेमके काय म्हणाले अमित शाह? जाणून घेऊ…
‘बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येणार’
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केले. राज्यातील जनतेचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा पाठिंबा आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीवर अनेकजण समाधानी आहेत, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही एनडीएला बहुमत मिळणार आणि १६० हून अधिक जागांवर आमचा विजय होणार, असा दावा अमित शाह यांनी केला. भारतीय जनता पक्षासह एनडीएमधील मित्रपक्षांचा विजयी स्ट्राइक रेट एकसमान असेल असेही ते म्हणाले.
‘देशात फक्त भाजपाचीच विचारधारा’
१९८० मध्ये भाजपाचा पुर्नजन्म झाला आणि २०२५ पर्यंत ४५ वर्षांच्या कालखंडात देशात १७ वर्ष भाजपाचे सरकार राहिले. आज जवळजवळ देशातील एक तृतीयांश राज्यात भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरकारे आहेत. तसेच हजारो, शेकडो स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात आहेत; यावरून आमच्या पक्षाची विचारधारा अनेकांनी स्वीकारली असल्याचे दिसून येते. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवले आहे, अशी आठवणही शाह यांनी करून दिली.
बिहारमधील विकासकामांचा वाचला पाढा
अमित शाह यांनी यावेळी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढाही वाचून दाखवला. “राज्यात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यास रोजगारांच्या संधी निर्माण केल्या जातील. तसेच सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण निश्चित केले जाईल. आतापर्यंत ११ वर्षांत एनडीए सरकारने राज्यात अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम केले आहे. उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पंतप्रधान मोदींनी आधीच विकसित केल्या आहेत. बिहारमध्ये अनेक लहान आणि मोठे उद्योग आहेत”, असे शाह म्हणाले.
तेजस्वी यादव यांच्यासह राजदला केलं लक्ष्य
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल पक्षाला निवडणुकीत यश मिळाले तर बिहारमध्ये जंगलराज येईल, अशी टीकाही अमित शाह यांनी केली. ते म्हणाले, “तेजस्वी यादव जरी राजदचे अध्यक्ष असले तरी पक्षाची सर्व सूत्रे अजूनही लालू प्रसाद यादव यांच्याच हातात आहेत. जर राज्यात त्यांचे सरकार आले तर नवीन चेहऱ्यांसह जंगलराज येईल, त्यामुळे माझे बिहारच्या जनतेला आवाहन आहे की त्यांनीही या गोष्टीचे भान ठेवावे. राज्याच्या विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहणे गरजेचे आहे. विकासकामे करण्याची हिंमत फक्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येच आहे. विरोधकांची महाआघाडी (राजद-काँग्रेसचा समावेश) कोणतीच कामे करणार नाही.”
‘बिहारची जनता काँग्रेसला धडा शिकवणार’
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. मतांसाठी नाचा म्हटले तर नरेंद्र मोदी नाचतीलही, अशी टीका त्यांनी केली होती. या टीकेचा अमित शाह यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांमुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेचा भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा झालेला आहे. यावेळी तर राहुल गांधी यांनी छट पूजेचाही अपमान केलेला आहे, त्यामुळे बिहारची जनता नक्कीच त्यांना धडा शिकवणार”, असे शाह यांनी म्हटले आहे.
भाजपा मुस्लिमांना तिकीट का देत नाही?
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले नाही, त्यावरून असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. याच मुद्द्यावरून भाजपा मुस्लीम उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट का देत नाही? असा प्रश्न अमित शाह यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “राष्ट्रीय लोकशाही आघाडीने यंदाच्या निवडणुकीत चार मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपाने मुस्लिमांना तिकीट न देणे ही काही नवीन बाब नाही”, असे शाह यांनी स्पष्ट केले. त्यामागचे कारण काय असे विचारले असता, “मुस्लिमांना तिकीट न देण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. निवडणुकीत ज्या उमेदवारांची विजयाची शक्यता जास्त असते”, त्यालाच उमेदवारी दिली जाते, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान
राज्यातील २४३ विधानसभा जागांसाठी दोन (६ आणि ११ नोव्हेंबर) टप्प्यांत मतदान होणार आहे; तर १४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची मंगळवारी सांगता झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या ७.४२ कोटी इतकी आहे. यंदा २४ जूनपर्यंत ही संख्या ७.८९ कोटी होती. मात्र, मसुदा यादीतून ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात सत्तास्थापन केली होती, त्यावेळी महाआघाडीनेही कडवी झुंज दिली होती. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.