तक्रारदाराकडून २ लाख ५० हजारांची लाच घेताना नायब तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकाने बुधवारी (दि.१०) अटक केली. पथकाने नायब तहसीलदारास नाशिक शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर लाच घेतले. सजय भिकाजी धनगर (वय ५१, रा. के. पी. मार्केट समोर, नाशिक) असे अटक केलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे.
सजय धनगर हे महसूल विभागात सिन्नर वर्ग २ चे अधिकारी आहेत. तक्रारदारांनी त्यांचा मुलगा व सुनेच्या नावे दोडी खुर्द (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील गट क्र. ४९९ क्षेत्र ३ हे ६० आर शेतजमीन खरेदी केली होती. सदर खरेदी खतावरून दोडी खुर्द येथील तलाठ्याने घेतलेल्या फेरफार नोंद क्र.३३४५ रद्द करण्यासाठी तक्रार दिली आहे. या तक्रारीचा निकाल तक्रारदारांच्या मुलगा व सुनेच्या बाजून लावून सुनावणीसाठी असलेला फेरफार नोंद क्र. ३३४५ मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात नायब तहसीलदार संजय धनगर यांनी ६ डिसेंबर रोजी तक्रारदाराकडे १० लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती २ लाख ५० हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने मंगळवारी (दि.९) शहानिशा करून सापळा रचला. नाशिक शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर रोडच्याकडेला तक्रारदाराकडून २ लाख ५० हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार संजय धनगर यांना पथकाने अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.