चंद्रावर जेवढा खर्च झाला नाही तेवढा 'या' रस्त्यावर! लोकसभेत ठाकरेंच्या खासदाराने गडकरींना आधी डिवचले नंतर हात जोडले...
महाराष्ट्रात आणि कदाचित भारतात सर्वाधिक काळ काम सुरू असलेला रस्ता कोणता असेल तर तो मुंबई-गोवा महामार्ग. तब्बल १६ वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यावरून वाहनचालकांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही संताप व्यक्त केला जातो. मग ते विरोधी पक्षातील असोत की सत्ताधारी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामाला खूप विलंब झाल्याचे आज पुन्हा एकदा लोकसभेत मान्य केले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी आज महामार्गाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. चंद्रावर जेवढा खर्च झाला नाही तेवढा या रस्त्यावर झाला आहे. तरीही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याची खोचक टिप्पणी करत सावंतांनी गडकरींना डिवचण्याच्या प्रयत्न केला. तुम्ही त्याकडे व्यक्तिगत लक्ष दिले तर काम लवकर होईल, अशी मी आपल्याला विनंती करतो. दहा वर्षांपासून खूप त्रास होतोय. हा रस्ता कधी होणार आणि कशाप्रकारे पूर्ण होणार, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. सावंत यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी डेडलाईन सांगून टाकली.गडकरी म्हणाले, सदस्य जे सांगत आहेत, ते खरं आहे. या रस्त्याचे काम २००९ मध्ये सुरू झाले होते. मी २०१४ मध्ये मंत्री झालो. हे काम त्यावेळच्या सरकारने सुरू केले होते. भूसंपादनाच्या खूप अडचणी होत्या. अनेक कॉन्ट्रॅक्टर बदलण्यात आले. काय कारण आहे माहिती नाही. खूप कारवाईही झाली. आतापर्यंत ८९ टक्के काम पूर्ण झाले. राहिलेले काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. पण या कामाला खूप विलंब झाला हे मी मान्य करतो, असे गडकरींनी सांगितले. त्यांच्या या उत्तरानंतर सावंतांनी हात जोडून त्यांचे आभार मानले.दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. प्रामुख्याने पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडतात. पाण्याचे तळे साचते. त्यातून वाच काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. आता गडकरी यांनी पुढील वर्षी एप्रिल महिन्याच्या आता रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.