बोगस अपंग प्रमाणपत्र : चंद्रपूर जिल्हा परिषदेतील १२ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कुऱ्हाड; कनिष्ठ अभियंत्यांचाही समावेश
चंद्रपूर : अपंग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणीची प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेदरम्यान यूडीआयडी (वैश्विक ओळखपत्र) सादर न केल्याप्रकरणी १२ कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकिंत सिंग यांनी ही कारवाई केली. यात पंचायत समितीतील काही कर्मचारी आणि कनिष्ठ अभियंत्यांचाही समावेश आहे. या कारवाईने जिल्हा परिषदेअंतर्गत कर्मचाऱ्यांत मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी शासनामध्ये सेवेत असलेल्या राज्यातील सर्व अपंग कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये कारवाई सुरू करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असलेले अपंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची यूडीआयडी (वैश्विक) प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.जिल्हा परिषदेत २५४ दिव्यांग कर्मचारी आहेत. त्यापैकी १६९ अपंग कर्मचाऱ्यांनी यूडीआयडी सादर केले. ८५ कर्मचाऱ्यांनी यूडीआयडी सादर केले नाही. मात्र, यातील ७३ कर्मचाऱ्यांनी यूडीआयसाठी अर्ज केले. यातील दोन अर्ज नाकारण्यात आले. तीन कर्मचाऱ्यांचे अपंगत्व ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळून आले. यूडीआयडी सादर न करणाऱ्या व ४० टक्क्यांपेक्षा कमी अपंग असलेल्या बारा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंग यांनी ८ डिसेंबर रोजी घेतला.
बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दहा शिक्षक आणि दोन कनिष्ठ अभियंत्यांचाही समावेश आहे. या कारवाईने बोगस प्रमाणपत्र घेऊन भरती झालेल्या अपंगांना घाम फुटला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.