१९ डिसेंबरला पंतप्रधानांसह राज्यातील मुख्यमंत्रीही बदलणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले स्पष्ट उत्तर..
नागपूर : देशाच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असून येत्या १९ डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधानच बदलणार आहे. देशाच्या पंतप्रधान पदी मराठी माणूस असेल असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. त्यानंतर १९ डिसेंबरला पंतप्रधानच नव्हे तर राज्यातील मुख्यमंत्रीही बदलणार, अशी चर्चा सुरू झाली.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परिसरात याबाबत चर्चा सुरू होती. विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेदरम्यान आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा केली. १९ डिसेंबरला राज्यात मोठा बदल होणार आहे अशी चर्चा आहे तर तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनणार काय, असा थेट सवाल शशिकांत शिंदेनी एकनाथ शिंदेना केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही या प्रश्नावर थेट उत्तर दिले आणि १९ डिसेंबरच्या चर्चेबाबत महत्वपूर्ण विधान केले.
१९ डिसेंबर चर्चेत का?
पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेले आहे. दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे या महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा हा दावा केला आहे. १९ डिसेंबर रोजी भारताचा पंतप्रधान बदलणार आहे. मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. अमेरिकेतील एक व्यक्ती इस्त्रायलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावले आणि स्टिंग ऑपरेशन केले. ही व्यक्ती लवकरच या बड्या नेत्यांची प्रकरणं समोर आणणार आहे. अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळे अमेरिकेत मोठे राजकीय संकट येईल. या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतातही दिसतील. कदाचित भारताचा पंतप्रधानही बदलेल असे ते म्हणाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानानंतर पंतप्रधान खरच बदलणार काय? त्यांची जागा कोणता मराठी चेहरा घेणार? याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
राज्याचा मुख्यमंत्री बदलणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद येणार काय याबाबत महत्वपूर्ण भाष्य केले. शिंदे म्हणाले,' आमचा एजेंडा हा खुर्ची नव्हे. मी काही सोन्याचा चमचा घेऊ जन्माला आलेलो नाही. मात्र सोन्याचे दिवस नक्की आणणार. आमच्यासाठी मुख्यमंत्री पद नव्हे तर सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे.' मुख्यमंत्री असताना मला घटनाबाह्य असल्याचे म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री झाल्यावरही घटनाबाह्य असल्याचा आरोप करत आहेत. काही लोकांची जळजळ ही पदावर नव्हे तर एकनाथ शिंदेवर आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.