सांगली : सहा वर्षाच्या मुलीच्या अन्ननलिकेत अडकलेला इंग्रजी एस आकाराचा हुक यशस्वी रित्या मिरजेतील शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांनी काढून मुलीला जीवदान दिले असल्याची माहिती उपअधिष्ठाता डॉ. रूपेश शिंदे यांनी बुधवारी दिली.
सांगलीवाडी येथील एका सहा वर्षाच्या मुलीने शोभेच्या झाडासाठी वापरण्यात येणारा इंग्रजी एस आकाराचा धातूचा हुक गिळला होता. तिला श्वास घेण्यास त्रास होउ लागला. तसेच तिच्या छातीत असह्य वेदना होत होत्या. पालकांनी रूग्ण मुलीला एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जोखीम अधिक असून मुलीच्या जीवाला धोकाही पोहचण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली. तसेच यासाठी मोठा खर्च करावा लागेल असेही सांगितले.पालकांनी खासगी रूग्णालयातून रूग्ण मुलीला उपचारासाठी तात्काळ मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केले. छातीच्या एक्सरेमध्ये धातूचा हुक आढळला. शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत दोरकर, निवासी डॉक्टरांचे पथक, भूलतज्ञ यांनी विनाविलंब उपचार सुरू केले. रूग्णास कमीत कमी इजा करत डॉक्टरांनी दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करून हा धातूचा हुक बाहेर काढला. रूग्ण मुलीला जीवदान मिळाले. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल मुलीच्या नातेवाईकांनी रूग्णालयाचे व उपचार करणार्या डॉक्टरांचे आभार मानले. या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रियांका राठी, डॉ. संतोष दळवी, डॉ. प्रिया होंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.