२८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. ते एका प्रायव्हेट विमानाने मुंबईहून बारामतीच्या दिशेनं जात होते. पण लँडिंग करताना झालेल्या विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्यासोबत विमानातील इतर चार जणांचा देखील मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पण अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनणार? हे अद्याप समोर आलं नाही.
अलीकडेच प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय
अध्यक्ष बनतील, अशी माहिती समोर आली होती. भाजपचे मंत्री पीयूष गोयल यांनी
तर थेट प्रफुल्ल पटेलांची अध्यक्षपदी निवड झाल्याचं सांगितलं होतं. पण नंतर
त्यांनी ही बाब नाकारली. या सर्व घडामोडीमुळे राष्ट्रवादीचा पुढचा
राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. पण आता
हा संस्पेन्स संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल
पटेल यांनीच नावाचा खुलासा केला आहे.
सुनेत्रा
पवार यांच्याकडेच पक्षाचं नेतृत्व सोपवण्याचा आमचा सगळ्याचा आग्रह
असल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. पटेल यांच्या वक्तव्यानंतर
सुनेत्रा पवार ह्याच राष्ट्रीय अध्यक्ष असतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं
समजलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनील तटकरे,
प्रफुल्ल पटेल अशी दोन नावं चर्चेत होती. पण सुनेत्रा पवारांकडेच पक्षाची
सूत्रं दिली जातील, असं आता बोललं जातंय.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
दिल्लीतील शोकसभेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजित पवार आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. आजही अजित दादांचा आवाज कानात घुमतो. आता आपली भेट होणार नाही असं दादा म्हणाले होते. मी आणि दादा एकाच वेळी राजकारणात आलो. दादांनी अनेक चढउतार हिमतीने पार केले. त्यांच्या प्रत्येक निर्णयात आम्ही सोबत होतो.अनेकांना वाटतं की, आम्ही शपथविधीसाठी घाई केली. पण आम्ही एक राजकीय पार्टी आहोत. आम्हाला अशा प्रक्रियेतून जावं लागेल. त्यातही आम्ही सगळ्याच्या भावना लक्षात घेऊन त्यांना साजेशे निर्णय घेऊ. काम करत राहा आणि पुढे जात राहा, हीच अजित दादांसाठी खरी श्रद्धांजली असेल. अजित दादांकडून प्रेरणा घेत आम्ही पुढे जाऊ. सुनेत्रा पवार यांना पुढे जाऊन नेता बनवायचं आहे. त्यांच्या आणि पार्टीच्या सर्व नेत्यांच्या मदतीने पक्षाला पुढे घेऊन जायचं आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात आमची पार्टी नवीन उंचीवर कशी जाईल, याची काळजी आम्ही करू. सुनेत्रा पवारांकडे पक्षाची सूत्रं सोपवण्याचा आमचा सर्वांचा आग्रह आहे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.