Big Breaking! इचलकरंजीत 'गँगवार'चा भडका! पोलिसांच्या डोळ्यांदेखतच गुन्हेगारावर गोळीबार;जखमी सांगलीचा
कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी शहर बुधवारी गोळीबाराने हादरून गेले. सांगली रोडवर पूर्ववैमनस्यातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगारावर भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे, हा थरार उपस्थित असलेल्या पोलिसांसमोरच घडला, ज्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सांगलीवाडी येथील गुन्हेगार ओंकार कांबळे आणि इचलकरंजीतील एका स्थानिक टोळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद धुमसत होता. बुधवारी या दोन्ही गटांचा आमना-सामना झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी ओंकार कांबळेवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर वेगाने घटनास्थळावरून पसार झाले.
रक्ताच्या थारोळ्यात अन् प्रकृती चिंताजनक
गोळीबाराच्या या हल्ल्यात ओंकार गंभीर जखमी झाला असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याची मृत्यूशी झुंज सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलिसांसमोरच धाडस
ज्यावेळी हा गोळीबार झाला, तेव्हा तिथे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांच्या उपस्थितीतच गुन्हेगाराने शस्त्र काढून गोळ्या झाडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे इचलकरंजीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तपासाची चक्रे फिरली
घटनेची भीषणता पाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा हल्ला गँगवार किंवा जुन्या वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
