सांगली :-...आता हळदीचीही रस्त्यावर 'एन्ट्री!';तेलंगणातून वाहने, चोका -चौकांत पावडर विक्री; परवान्याविना प्रश्नचिन्ह
सांगली : शहरात कांदा आणि मिठाच्या रस्त्यावर विक्रीनंतर आता तेलंगणा राज्यातून थेट हळकुंड दळून तयार केलेल्या पावडरची विक्री सुरू झाली आहे. काही वाहनांमधून आलेले विक्रेते प्रमुख चौकांमध्ये वाहने उभी करून थेट ग्राहकांना हळद पावडर विकताना दिसत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून चौकाचौकांत अशी विक्री सुरु आहे. याबाबतचा मारुती चौकातील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर हळदीच्या विक्रीमुळे शहरात चर्चा रंगली असून प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या संबंधित विक्रेते शंभर रुपये पाव किलो आणि तीनशे रुपये किलो या दराने हळद पावडर विक्री करत आहेत. कमी दरामुळे काही ग्राहक आकर्षित होत असले, तरी विक्रीसाठी कोणताही अधिकृत परवाना, नोंदणी किंवा अन्नसुरक्षा प्रमाणपत्र असल्याचे स्पष्ट दिसत नसल्याने शंका उपस्थित होत आहे.परवान्याविना आणि कर न भरता होणाऱ्या व्यापाराने नियमित व्यापाऱ्यांवर फरक पडणार आहे. दर्जा आणि अन्नसुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होतात. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापारी संघटनांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. अन्न-औषध प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.सांगलीतील हळद व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्या हळदीचा हंगाम सुरू असून बाजारात दररोज मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. सांगलीत तयार होणाऱ्या हळदीची गुणवत्ता तेलंगणाहून आलेल्या मालापेक्षा सरस असल्याचा दावा त्यांनी केला.स्थानिक बाजारातही हळद २५० ते ३०० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेरील विक्रेत्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हळद विक्रीबाबत आजच माहिती मिळाली. हे खरे आहे. तो शेतकरी असेल असे वाटत नाही; मात्र बाजार समितीच्या कक्षेबाहेरील व्यापारावर नियंत्रण ठेवता येत नाही.- महेश चव्हाण, सचिव, सांगली बाजार समिती, सांगली
मार्केटिंगचा नवा हा 'ट्रेंड' आला आहे. परिवर्तन ही काळाची गरज आहे. ग्राहकांच्या घरापर्यंत माल पोहोच केला जातो आहे. याला आता व्यापारी नव्हे, कोणीच रोखू शकणार नाही. आता व्यापारी बंधूंनीही आपल्यात बदल स्वीकारला पाहिजे.
कमी पैशांत चांगला व्यापार आणि शेतकऱ्याला तत्काळ रक्कम दिली पाहिजे. परिवर्तन होत असताना लगेच जुनेही संपणार नाही. शेतकऱ्यांची तरुण पोरं बदलली आहेत. आता त्यासाठी व्यापारी, बाजार समिती, कामगारांनी स्वतःपासून बदलाला सुरुवात केली पाहिजे. तरच भविष्य आहे.
- गोपाळलाल मर्दा, हळद व्यापारी,
सांगली हळकुंड दळून हळद विक्रीचा व्हिडीओ आमच्यापर्यंत आला आहे. सांगली बाजार समितीत दररोज २० हजार हळकुंड पोत्यांची मोठी आवक सुरू आहे. शिवाय ते विक्री करीत असलेल्या गुणवत्तेपेक्षा कितीतरी सरस हळद सांगलीत २५० ते ३०० रुपये किलो दराने मिळते आहे. संबंधित विक्री करणारे शेतकरी आहेत की व्यापारी, हे तपासावे लागेल.- अमरसिंह देसाई, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
