गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी पूर्व इंडोनेशियामध्ये 7.4 इतक्या प्रचंड तीव्रतेचा मोठा भूकंप झाल्याचं वृत्त समोर आलं. मोलुक्का समुद्रात शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर इंडोनेशियामध्ये इमारती जोरदारपणे हादरल्या आणि घरातील, दुकानातील वस्तू इत्रतत्र कोसळल्या.
नागरिक जीवाच्या आकांतानं पळू लागले, ठिकठिकाणी किंकाळ्या फोडत या क्षणी सर्वजण पळ काढताना दिसले. प्राथमिक माहितीनुसार इंडोनेशियातील टर्नाटेच्या किनाऱ्यापासून 74 मैल अंतरावर हा महाभूकंप झाला आहे. ज्यानंतर त्सुनामी इशारा केंद्राने इंडोनेशिया, मलेशिया आणि फिलीपिन्सच्या किनारपट्टी भागात त्सुनामीच्या भयंकर लाटा उसळण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकी केंद्रानं जारी केलेल्या माहितीनुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून साधारण 1000 किमी अंतराच्या परिसरामध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सकाळीच आलेल्या या भूकंपानंतर नागरिक भीतीपोटी तातडीनं जीव वाचवत घरांबाहेर आले, प्राणीमात्रांनी एकच कोलाहल माजवला. हवाईस्थित पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्राच्या माहितीनुसार हा भूकंप इतका मोठा होता की त्यामुळं फिलिपिन्स, मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये समुद्र खवळून त्सुनामीचा धोका संभवतो. ज्यामुळं भूकंपामागोमाग आता नागरिकांच्या मनात त्सुनामीची दहशत पाहायला मिळत आहे.
या मोठ्या भूकंपानंतर काही वेळातच होनोलूलू स्थित त्सुनामी इशारा केंद्राच्या माहितीनुसार दक्षिणी फिलिपिन्समध्ये उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली. इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार उत्तर सुलावेसी प्रांताच्या तटीय शहर असणाऱ्या बिटुंग आणि नजीकच्या भागामध्ये 10 ते 20 सेकंदांसाठी भूकंपांची तीव्र कंपनं जाणवली. सध्या इंडोनेशियासह नजीकच्या भागात प्रामुख्यानं समुद्रकिनारी भागांमध्ये मुक्कामी असणाऱ्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्ववत झाल्याची अधिकृ घोषणा प्रशासन करत नाही तोपर्यंत नागरिकांनी किनारपट्टी भागांकडे येऊ नये असंही आवाहन करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.