पुणे : कौटुंबिक वादातून मुलाच्या हत्येसाठी ७५ लाख रुपयांची सुपारी प्रकरणात पिस्तूल पुरवणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. जंगली महाराज रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आल्यानंतर पिस्तूल पुरवणारा आरोपी पसार झाला होता.
निलेश श्रीकांत गायकवाड (वय २४, रा. पिसोळी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १६ एप्रिल २०२४ रोजी जंगली महाराज रस्ता परिसरात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर पिस्तुलातून गाेळीबार करण्यात आला होता. मात्र, पिस्तुलातून गोळी न उडाल्याने बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा वाचला. या घटनेनंतर दुचाकीवरून हल्लेखोर पसार झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात कौटुंबिक वादातून बांधकाम व्यावसायिक पित्याने मुलाची हत्या करण्यासाठी दोघांना ७५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाली.
पाेलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह हल्लेखोरांना अटक केली होती. गोळीबार प्रकरणात पिस्तूल पुरवणारा आरोपी गायकवाड हा पसार झाला होता. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी पिसोळी भागात गस्त घालत होते. त्या वेळी गायकवाड हा आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गायकवाडला पकडले. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कामगिरी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.