Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कवठेमहांकाळमध्ये गॅससाठी रणकंदन: सिलिंडर वाटपावरून ग्राहकांचा संताप, गोडाऊनला वेढा

कवठेमहांकाळमध्ये गॅससाठी रणकंदन: सिलिंडर वाटपावरून ग्राहकांचा संताप, गोडाऊनला वेढा


कवठेमहांकाळ : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील इन्डेन गॅसची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक हैराण झाले होते. ही विस्कळीत सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने आजपासून प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे बुधवारी (दि.१) सकाळी नांगोळे रस्त्यावरील गॅस गोडाऊनजवळ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेरीस पोलिस आणि महसूल प्रशासनाने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. 
गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेले ग्राहक बुधवारी पहाटेपासून रखरखत्या उन्हात नांगोळे रस्त्यावरील गोडाऊनबाहेर रांगेत उभे होते. यावेळी प्रशासनाने गॅस टाक्यांचे वितरण थेट ग्रामीण भागात गावोगावी करण्याचे नियोजन जाहीर केले. हे ऐकून रांगेत उभे असलेले ग्राहक अधिकच संतापले. जर ग्रामीण भागातच गॅस मिळणार होता, तर आम्हाला पहाटेपासून इथे का ताटकळत ठेवले ? असा सवाल करत गॅस वितरणाच्या गाड्या रोखून धरल्या.
गोडाऊन परिसरातील वाढता तणाव पाहता गॅस एजन्सीने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. मात्र, नागरिक आपल्या मागणीवर ठाम असल्याने गोंधळ सुरूच राहिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नायब तहसीलदार संजय पवार आणि पुरवठा निरीक्षक शुभम पुरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्राहकांशी संवाद साधून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

सिलिंडर वितरणात पारदर्शकता आणणार

गॅस एजन्सीला दररोजच्या वितरणाची यादी तहसील कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला. तसेच सिलिंडर वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ग्राहकाचे बुकिंग ज्या तारखेचे आहे, त्यानुसार गॅस सिलिंडर वाटप केले जाईल. ग्राहकांनी गोडाऊन जवळ गर्दी करु नये. प्रत्येक गावामध्ये तारखेप्रमाणे बुकिंग असेल तर त्या ठिकाणीच सिलिंडर पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अफवांपासून सावध राहा : संजय पवार
याबाबत बोलताना नायब तहसिलदार संजय पवार म्हणाले, ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. गॅस सिलिंडरची वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. सर्वांना बुकिंगनुसार गॅस सिलींडर मिळेल, कोणाचीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.