Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! सिव्हिल हॉस्पिटलमधील '७७ नंबर' बनले भ्रष्टाचाराचा अड्डा; टक्केवारीच्या 'दक्षिणे'शिवाय फाईल भागतच नाही!

सांगली दर्पण Exclusive! सिव्हिल हॉस्पिटलमधील '७७ नंबर' बनले भ्रष्टाचाराचा अड्डा; टक्केवारीच्या 'दक्षिणे'शिवाय फाईल भागतच नाही!


आजारी शासकीय कर्मचारी अन् नातेवाईकांची उघड लूट; 'सांगली दर्पण'च्या बातमीने खळबळ


​सांगली :- सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब आणि रंजल्या-गंजलेल्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात सांगली जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालये आणि तिथले अधिकारी आघाडीवर असल्याचे चित्र आहे. सध्या काही शासकीय अधिकाऱ्यांनी आपली कार्यालये म्हणजे जणू काही अधिकृत 'दुकाने' मांडल्याचे पाहायला मिळत आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रासारख्या उदात्त व्यवसायातील काही अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत सापडलेल्या लोकांची पैशांसाठी अत्यंत निर्घृणपणे पिळवणूक करत आहेत. यातीलच एक मुख्य 'दुकान' सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातील रूम नंबर ७७ येथे सुरू असल्याचा खळबळजनक खुलासा त्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी 'सांगली दर्पण'शी बोलताना केला आहे.

​टक्केवारीची 'दक्षिणा' अन् '७७ नंबर'चे पुजाऱ्यांचे देव प्रसन्न!
​मिळालेल्या माहितीनुसार, आजारी शासकीय कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या नातेवाईकांच्या वैद्यकीय उपचाराची बिले  पास करून घेण्यासाठी या ७७ नंबर रूमच्या फेऱ्या माराव्या लागतात. धक्कादायक बाब म्हणजे, येथील भ्रष्ट 'पुजाऱ्याला' टक्केवारीच्या स्वरूपात मोठी दक्षिणा दिल्याशिवाय येथील देव प्रसन्न होतच नाही, अशी संतप्त आणि आर्त हाक रुग्णांच्या नातेवाईकांनी' सांगली दर्पण'ला डोळ्यात पाणी आणून दिली आहे.

आधीच गंभीर आजारपण आणि त्यात उपचारासाठी झालेला प्रचंड खर्च यामुळे कर्जबाजारी झालेले लोक त्रस्त असतात. अशा परिस्थितीत स्वतःच्या हक्काचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी या वाटमारी करणाऱ्या 'वाल्या' आणि त्याच्या टोळीला लाचेची रक्कमेची आहुती द्यावी लागत आहे. पैशांची तजवीज करताना अडचणीत सापडलेल्या या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची प्रचंड मानसिक व आर्थिक घालमेल होत आहे.
​'लक्ष्मी दर्शना'नंतर नियम पायदळी!

या ७७ नंबरच्या दुकानात एकदा का 'लक्ष्मी दर्शन' झाले, की अपात्र आणि नियमात न बसणाऱ्या फाईल्स सुद्धा नियमात बसवून शासनाची सरळ-सरळ फसवणूक केली जाते. दुसरीकडे, ज्यांची प्रकरणे पूर्णपणे कायदेशीर आणि नियमात बसणारी आहेत, अशा गरीब रुग्णांची अडवणूक करून त्यांच्याकडूनही सक्तीने मोठी लूट केली जाते. प्रकरण नियमात असो वा नसो, जोपर्यंत 'शेरास सव्वा शेर' गाठ पडत नाही किंवा लाचेचा हिस्सा मिळत नाही, तोपर्यंत इथून सुटका होत नाही.

​एजंटची टोळी सक्रिय; ऑडिट करण्याची मागणी

​या ७७ नंबर रूममध्ये अनेक दलाल आणि एजंटमार्फत ही राजरोस वाटमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांत या टेबलवरून पास झालेल्या सर्व वैद्यकीय बिलांचे आणि प्रकरणांचे जर सखोल 'फॉरेन्सिक ऑडिट' केले, तर या भ्रष्टाचाराच्या महासागरातील सत्य परिस्थिती आणि मोठे मासे उजेडात येतील.

​लोकप्रतिनिधी आणि यंत्रणांची 'डोळेझाक' का?
​येथील अधिकाऱ्याच्या एकाधिकारशाहीमुळे आणि मुजोरपणामुळे हा काळाबाजार फोफावला आहे. परंतु, अत्यंत गंभीर बाब म्हणजे सांगलीतील इतर शासकीय यंत्रणा आणि जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी या उघड लुटीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यांच्या या मूक संमतीमुळेच सिव्हिल हॉस्पिटलमधील हे लाचखोरीचे 'दुकान' सध्या जोरात सुरू असल्याचे विदारक चित्र आहे. आता या रॅकेटवर वरिष्ठ पातळीवरून कडक कारवाई होणार की 'वरकमाई' मधेच हे प्रकरण दाबले जाणार, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.
क्रमश....

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.