भारत हा प्राचीन मंदिरे, चमत्कार आणि अथांग श्रद्धेचा देश आहे. आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांची रहस्ये आजचे आधुनिक विज्ञानही पूर्णपणे उलगडू शकलेले नाही. असेच एक विस्मयकारक आणि अद्भूत शिवमंदिर आपल्या शेजारील गुजरात राज्यात आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दिवसातून दोन वेळा डोळ्यांदेखत समुद्राच्या पाण्यात पूर्णपणे गायब होते आणि काही तासांनंतर पुन्हा आपल्या मूळ रूपात बाहेर येते.
असं मंदिर जे दिवसातून दोन वेळा होत गायब...
हे अनोखे मंदिर गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील जंबुसर शहराजवळ असलेल्या 'कावी कंबोई' गावातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे. हे मंदिर अरबी समुद्र आणि खंभातच्या आखाताच्या अगदी मधोमध स्थित आहे. या मंदिराचे गायब होणे ही कोणतीही जादुई घटना नसून तो समुद्राच्या भरती-ओहोटीचा एक नैसर्गिक चमत्कार आहे. दिवसातून दोन वेळा जेव्हा समुद्रात मोठी भरती येते, तेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढते आणि संपूर्ण मंदिर, तसेच त्यातील 4 फूट उंच शिवलिंग लाटांच्या खाली म्हणजेच समुद्रात पूर्णपणे गडप होते. केवळ मंदिराचा वरचा कळस पाण्याच्या वर दिसतो. जेव्हा भरती ओसरते आणि ओहोटी सुरू होते, तेव्हा समुद्राचे पाणी मागे सरकते आणि पूर्ण मंदिर जसेच्या तसे पुन्हा बाहेर येते. पाणी ओसरल्यानंतरच भाविकांना मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घेता येते. निसर्ग स्वतः दिवसातून दोन वेळा समुद्राच्या लाटांद्वारे महादेवांचे रूप असलेल्या या शिवलिंगावर 'जलाभिषेक' करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
काय आहे इतिहास?
स्तंभेश्वर महादेव मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन असून, हिंदू धर्मातील 18 पुराणांपैकी एक असलेल्या 'स्कंद पुराणात' या मंदिराचा सविस्तर उल्लेख आढळतो. पौराणिक कथेनुसार, तारकासूर नावाचा एक असुर भगवान शिवाचा मोठा भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले आणि 'शिवाच्या पुत्राशिवाय इतर कोणाकडूनही माझा वध होणार नाही' असा वरदान मागून घेतला. वरदान मिळताच तारकासुराने त्रैलोक्यात हाहाकार माजवला आणि देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. तारकासुराच्या अत्याचारातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र भगवान कार्तिकेय यांनी वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी देवांच्या सेनेचे नेतृत्व केले आणि महिषागर संगम क्षेत्रावर तारकासुराचा वध केला. तारकासूर जरी राक्षस असला तरी तो शिवभक्त होता, त्यामुळे त्याचा वध केल्यामुळे बाल कार्तिकेयांना अत्यंत पश्चाताप झाला. आपल्या हातून घडलेल्या या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान विष्णूंच्या सल्ल्याने कार्तिकेयांनी या ठिकाणी तीन दिव्य शिवलिंगांची स्थापना केली. त्यापैकीच एक मुख्य शिवलिंग म्हणजेच 'श्री स्तंभेश्वर महादेव'.
पर्यटकांसाठी महत्त्वाची माहिती
स्तंभेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते. मंदिरात जाण्यापूर्वी स्थानिक प्रशासन किंवा मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून समुद्राच्या भरती आणि ओहोटीची अचूक वेळ जाणून घेणे बंधनकारक आहे. जर तुम्ही चुकीच्या वेळी तिथे पोहोचलात, तर तुम्हाला केवळ अथांग समुद्र पाहायला मिळेल, मंदिर नाही.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. सांगली दर्पण याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.