दरवर्षी १ ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुसाचा कॅन्सर दिन (World Lung Cancer Day) मानला केला जातो. या दिवसाचा उद्देश फुफ्फुसाच्या कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा आहे. हा कॅन्सर वेळेत ओळखला गेला नाही तर फुफ्फुसातील ट्यूमर हळूहळू वाढत जातो आणि पुढे जीवावरही बेतू शकतो.
त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी लक्षणं ओळखून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी लक्षणं
थोडं चाललं किंवा काम केलं तरी दम लागणं
चालणं, जिने चढणं किंवा हलकं काम करतानाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. काही वेळा श्वसनमार्गात द्रव साचल्यामुळे असं होऊ शकतं.
छातीत, पाठीत, खांद्यात किंवा हाडांमध्ये वेदना
फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे छाती, पाठ आणि खांद्यामध्ये दुखू शकतं. कॅन्सर हाडांपर्यंत पसरल्यास हाडांमध्येही वेदना जाणवू लागतात.
सतत खोकला येणं
खोकला अनेक आठवडे कायम राहणं किंवा औषधं घेतल्यानंतरही बरा न होणं, हे फुफ्फुसाशी संबंधित गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. फुफ्फुस व्यवस्थित काम करत नसल्यामुळे अशी समस्या निर्माण होऊ शकते.
आवाजात बदल होणं
अचानक आवाज बसणे, आवाज जाड होणं किंवा सतत घरघर जाणवणं ही देखील महत्त्वाची लक्षणं आहेत. सर्दीमुळेही असं होऊ शकतं. मात्र हा त्रास अनेक आठवडे कायम राहिला तर डॉक्टरांकडे तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
भूक कमी होणं
कोणतेही कारण नसताना भूक कमी होणं, वजन वेगाने कमी होणं आणि दिवसभर थकवा जाणवणं हीही फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
कोणाला फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो?
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका सर्वाधिक असतो.स्वतः धूम्रपान करत नसले तरी इतरांच्या सिगारेट किंवा तंबाखूच्या धुराच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींनाही हा धोका वाढतो.रेडॉन, युरेनियम, डिझेलमधून निघणारे धूरकण, सिलिका, कोळशाशी संबंधित पदार्थ किंवा इतर विषारी रसायनांच्या संपर्कात वारंवार येणाऱ्या व्यक्तींमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.कुटुंबातील एखाद्या सदस्याला यापूर्वी फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असेल तर इतर सदस्यांमध्येही त्याचा धोका वाढू शकतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.