सांगली पोलिसांचे ऐतिहासिक यश! DySP सुनील साळुंखे यांच्या उत्कृष्ट तपासाने जिल्ह्यातील पहिल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला 'फाशी'
सांगली :-करजगी (ता. जत) येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अनन्वित अत्याचार करून तिचा अत्यंत निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमाला सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची (मृत्युदंड) शिक्षा सुनावली आहे. उमदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या अत्यंत संवेदनशील व भीषण गुन्ह्यात जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) सुनील साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ १३ दिवसांत सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल केले होते. पोलिसांच्या या अत्यंत गतिमान, शास्त्रीय आणि कडक तपासामुळेच आरोपीला फाशीची शिक्षा मिळून चिमुकलीला न्याय मिळाला आहे.
पांडुरंग सोमन्ना कळळी (वय ४५, रा. करजगी, ता. जत) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.
लोखंडी पेटीत आढळला होता मृतदेह: घटनेने सांगली जिल्हा हादरला
ही थरारक आणि मन सुन्न करणारी घटना ६ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली होती. पीडित ४ वर्षांची बालिका घरासमोर खेळत असताना आरोपी पांडुरंग कळळी याने तिला फुस लावून स्वतःच्या घरात नेले. तेथे तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केली. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह एका पोत्यात भरून घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवला होता.
मुलगी गायब झाल्याचे समजताच करजगीचे सरपंच श्री. चन्नाप्पा पट्टणशेटी व ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला. आरोपीच्या घराजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी त्याच्या पत्राच्या शेडची पाहणी केली. त्यावेळी तेथे रक्ताचे डाग आणि लोखंडी पेटीतील पोत्यात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
जातीय तणाव रोखण्यात पोलिसांची समयसूचकता
पीडित बालिका मुस्लीम समाजाची आणि आरोपी हिंदू-धनगर समाजाचा असल्याने गावात तीव्र असंतोष पसरला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ गावात मोहल्ला कमिटी व शांतता समितीची बैठक घेतली. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करून गावात कोणताही जातीय तणाव अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही.
अवघ्या १३ दिवसांत दोषारोपपत्र; पोलिसांचा 'सुपरफास्ट' तपास
जनतेतील आक्रोश आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य तपास अधिकारी DySP सुनील साळुंखे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे २:०२ वाजता आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी तांत्रिक, भौतिक आणि वैद्यकीय (फॉरेन्सिक) पुरावे अत्यंत शिस्तबद्धतेने गोळा केले.
घटनेच्या अवघ्या १३ दिवसांत (१८ फेब्रुवारी २०२५ रोजी) सांगलीच्या विशेष न्यायालयात (Special Case No. 38/2025) दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१), २३८, ६५(२), १२७(२) तसेच पोक्सो (POCSO) कायद्यातील कडक कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने सुनावली 'फाशी'ची ऐतिहासिक शिक्षा
मा. जिल्हा व सत्र न्यायालय, सांगली यांच्यासमोर चाललेल्या सुनावणीत सरकारी पक्ष आणि पोलिसांनी सादर केलेले वैद्यकीय व फॉरेन्सिक पुरावे अत्यंत निर्णायक ठरले. न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरत आरोपी पांडुरंग कळळी याला दोषी ठरवून फाशीची ऐतिहासिक शिक्षा सुनावली.
या पोलीस पथकाची कौतुकास्पद कामगिरी
आरोपीस फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी खालील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली:
तपास अधिकारी: श्री. सुनील साळुंखे (तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, जत)
सह-तपास अधिकारी: श्री. सचिन कांबळे (तत्कालीन प्रभारी अधिकारी, उमदी पोलीस ठाणे)
मदतनीस अंमलदार: पोहेकॉ १८६ सुनील व्हनखंडे, पोहेकॉ १९२८ संतोष माने, पोशि शिवाजी माळी
पैरवी अंमलदार: पोहेकॉ वंदना मिसाळ (त्यांनी न्यायालयात साक्षी-पुराव्यांचे कामकाज अत्यंत चोखपणे सांभाळले.)
"अशा प्रकारच्या क्रूर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला तातडीने कठोर शिक्षा मिळणे हेच समाजासाठी आणि पीडित कुटुंबासाठी खरे समाधान असते. सांगली पोलिसांच्या या धडक कारवाईचे आणि DySP सुनील साळुंखे यांच्या उत्कृष्ट तपासाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.