सांगली :- शहरातील गोकुळनगर परिसरात सोमवारी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास एका पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्रांनी सपासप वार करून अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला. या थरारक घटनेने संपूर्ण सांगली शहर हादरले आहे. गौरव सदानंद सर्जे (वय २५, रा. नवीन वसाहत, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव सर्जे हा सोमवारी सायंकाळी गोकुळनगर परिसरात थांबला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याला गाठले. त्यांच्यात प्राथमिक वाद झाल्यानंतर, हल्लेखोरांनी क्रूरतेची सीमा गाठत धारदार शस्त्रांनी गौरवच्या चेहरा, छाती, पोट आणि पाठीवर सपासप वार केले. गौरव रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर:
घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक संदीप भागवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह विश्रामबाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
'खून का बदला खून'? शहरात गँगवॉरची चर्चा!
मृत गौरव सर्जे याच्यावर यापूर्वीही मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल होते. काही महिन्यांपूर्वी सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रात एका तरुणाचा निर्घृण खून झाला होता, ज्यामध्ये गौरवचा भाऊ हा मुख्य संशयित आरोपी आहे. त्यामुळे त्याच जुन्या वादातून अन् भावाच्या कृत्याचा बदला घेण्यासाठीच गौरवचा काटा काढण्यात आला असावा, असा तीव्र संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सांगलीत पुन्हा एकदा टोळीयुद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.